कोल्हापूर : राज्य सरकारच्या अन्न नागरी पुरवठा विभागानं लाभार्थ्यांना रेशनऐवजी रोख रक्कम सबसीडीच्या स्वरुपात देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्याविरोधात कोल्हापूरात रेशन बचाव कृती समितीच्यावतीन भव्य मोर्चा काढण्यात आला. कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते. राज्यातल्या शिधापत्रिकाधारकांना थेट धान्य उपलब्ध करुन द्यावं, केरोसिनचे बंद केलेले डेपो पूर्ववत सुरू करावेत अशा मागण्या या मोर्चाच्या निमीत्तान करण्यात आल्या. 


इतकच नव्हे तर सार्वजनिक वितरण व्यवस्थेत खंडणी मागण्याचे प्रकार घडतायत. त्याबाबत शासनानं कठोर कारवाई करावी अशी मागणीही मोर्चेकऱ्यांनी केली. कोल्हापूरातील मिरजकर तिकटीमधून काढण्यात आलेला हा मोर्चा शहरातील विविध भागातून फिरुन कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकला.