लाडक्या बहिणीसाठी विरोधक सरसावले, छाननीवरून विरोधकांची सरकारवर टीका
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची छाननी सुरु झाल्यानं लाखो महिलांची धाकधूक वाढलीय. या योजनेतून आपलं नाव बाद तर होणार नाही ना, पैसे खात्यातून परत तर जाणार नाही ना याची भीती त्यांना सतावतेय. आता याच मुद्द्यावरुन विरोधकांनीही आरोपांची राळ उडवलीय.
Ladki Bahin Yojana : राज्यात पुन्हा सत्तेत येण्यासाठी महायुतीला लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली. या लाड़क्या बहिणीच्या जादूनं महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला. मात्र आता सत्तेत आल्यावर महायुतीनं याच लाडकी बहीण योजनेतील अर्जांची छाननी करायला सुरुवात केलीय. यात अपात्र आणि एकावेळी अनेक सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांचे अर्ज बाद होणार आहेत. यावरुन आता विरोधकांनी रान उठवलंय.
लाडक्या बहिणींसाठी विरोधक मैदानात
विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेचा फायदा हा महायुती सरकारला झाला. त्यानंतर आता याच लाडकी बहीण योजनेतील अर्जांची छाननी सुरु झाली आहे. अशातच आता यावरून महायुतीवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत घोटाळा झाला असून लाडकी बहीण योजना ही फक्त निवडणूक जिंकण्यासाठी होती असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राज्य सरकारची परिस्थिती आता भीक मागण्या सारखी झाली आहे. मतं घेताना निकष नव्हते मग आता का असा सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
रोहित पवार यांनी केंद्र सरकारच्या किसान सन्मान निधी योजनेची आठवण करुन दिली आहे. तेव्हाही सुरुवातीला सर्व शेतकऱ्यांना पैसे दिले. मात्र नंतर टप्प्याटप्प्यानं 70 टक्के शेतकऱ्यांचे पैसे थांबले इतकंच नाही तर ज्यांच्या खात्यात पैसे गेले त्यांना ते परत करण्याचे आदेशही देण्यात आले होते असं रोहित पवार यांनी म्हटलं. तर सुप्रिया सुळे यांनीही सरकारनं सुरु केलेल्या छाननीवर नाराजी व्यक्त केलीय.
विरोधकांच्या आरोपांना एकनाथ शिंदेंकडून उत्तर
विरोधकांना टीका करण्याशिवाय दुसरं काय काम नाही. लाडकी बहीण योजना सुरु करतानाही त्यांनी टीका केली. ते ही योजना बंद पाडण्यासाठी कोर्टात गेले. कोर्टाने त्यांना फटकारले. सावत्र भावांना लाडक्या बहिणींनी जागा दाखवली आहे. पात्र बहिणी या योजनेपासून दूर जाणार नाहीत असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
ज्या लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीला फायदा झाला, त्याच लाडक्या बहिणींच्या पैशांना पडताळणी आणि नियमांची चाळणी लागतेय. त्यामुळे महायुतीची सत्ता आल्यावर आता लाडक्या बहिणी दोडक्या झाल्याचा सूर विरोधकांमधून निघू लागलाय. जर खरंच ही चाळण मोठी झाली तर घराघरातून नाराज लाडक्या बहिणींची गाऱ्हाणीही सुरू होतील यात शंका नाही.