नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक झालेले पाहायला मिळाले. अनेक मुद्द्यांवरून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार केला. त्यामुळे पुढची पाच वर्षे सत्ताधाऱ्यांना विरोधी पक्षनेत्यांचे कडवे आव्हान असणार आहे याची प्रचिती या चार दिवसात आली. आज अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी सर्वपक्षीय आमदारांचं फोटोसेशन पार पडलं. यावेळी सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षातील आमदारही उपस्थित होते. पण विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी या फोटोसेशनला दांडी मारली. त्यामुळे हा चर्चेचा विषय बनला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजकीय हेवेदावे बाजुला ठेवून फडणवीसांनी फोटो सेशनमध्ये सहभागी व्हायला हवे होते अशी चर्चा आमदारांमध्ये रंगू लागली. यावेळी अनेक आमदारांनी आधीपासूनच विधानसभेच्या पायऱ्यांवर गर्दी केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह छगन भुजबळ, अजित पवार, अशोक चव्हाण, जयंत पाटील, राधाकृष्ण विखे-पाटील उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांनी जोधपुरी परिधान केला होता. त्यामुळे अजित पवारांचा जोधपुरी लक्षवेधी ठरला. 



मफलर हे ज्यांचं स्टाईल स्टेटमेंट आहे असे छगन भुजबळही काळ्या जोधपुरीत दिसले. या फोटोसेशनला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली. अखेर त्यांच्यासाठी रिक्त असलेल्या खुर्चीवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बसले आणि फोटोसेशन पार पडलं.