इतिहासाच्या पुस्तकात शिवरायांचा ओझरता उल्लेखही नाही
अभ्यासक्रमावरुन पुन्हा नव्या वादाने डोकं वर काढलं आहे
दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई : महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळातील चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकात शिवरायांचा इतिहासच काय तर शिवरायांचा साधा उल्लेखही नाही. त्यामुळे आता नव्या राजकीय वादाला तोंड फुटलं आहे.
एसएससी बोर्डाच्या चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये महाराजांचा सविस्तर इतिहास आहे. पण, महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय मंडळाच्या पुस्तकात मात्र याच महाराजांचा ओझरता उल्लेखही नाही. शिक्षकांसाठी असणाऱ्या पुस्तकात शिवरायांसाठी एखाद्याच ओळीचा उल्लेख आहे. हाच मुद्दा उपस्थित करत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे.
इतिहासाच्या पुस्तकातून महाराजांचा इतिहासच मिटवण्याचा घाट घातल्याचा आरोप काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी करत राजकीय स्वार्थाचा वापर करत सत्तेवर आलेल्यांनी आता महाराजांचा इतिहास अशा प्रकारे मिटवण्याचा प्रयत्न करणं ही बाब अतिशय भयावह असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. तर, छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या मनामनात शिवकालीन इतिहास पोहोचवणारे आणि राजकारणात सक्रिय असणारे डॉ. अमोल कोल्हे यांनीही या प्रकाराचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाचा खुलासा
इतिहासाच्या मुद्द्यावरुन चिघळणारा वाद पाहता महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाकडून एक खुलासा करण्यात आला आहे.
आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाचा संपूर्ण अभ्यासक्रम हा संकल्पनेवर आधारित आहे. कोणताही विषय चौथीपर्यंत स्वतंत्र नाही. चौथीपासून नव्हे, तर सहावीपासून शिवरायांच्या इतिहासाचा अभ्यासक्रमात समावेश केला जाणार असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.
महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाचा वर्ग आता फक्त चौथीपर्यंत पोहोचला आहे. आजून हा वर्ग पुढे जायचा आहे. सध्याच्या घडीला हा वर्ग सुरु होऊन चार वर्षे झाली आहेत. पुढे सहावीपर्यंत गेल्यावर हा अभ्यासक्रम उलगडत जाईल अशी प्रतिक्रिया उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली.
पुढील वर्षांमध्ये अभ्यासक्रमात शिवरायांच्या इतिहासाचा समावेश असेलही, किंवा सध्याच्या घडीला करण्याता आलेला हा खुलासा वेळ मारुनही करण्यात आला असू शकतो. पण, एकंदरच सध्याचे राजकीय रंग पाहता निवडणुकीच्या वातावरणात हा मुद्दा तापणार हे मात्र निश्चित.