Refinery Project : कोकणातील रिफायनरीविरोधात बारसू , सोलगावचे नागरिक आक्रमक; कातळावरच ठोकले तंबू
Barsu Refinery Project : कोकणातील रिफायनरीविरोधात बारसू आणि सोलगावचे नागरिक आक्रमक झालेत. ग्रामस्थांनी कातळावरच तंबू ठोकले आहेत. त्यामुळे हे आंदोलन चिघण्याची शक्यता आहे.
Konkan Refinery Project : कोकणातील रिफायनरी प्रकल्प (Refinery Project ) विरोध आणखी तीव्र करण्यासाठी विरोधक पुढे सरसावलेत. (Maharashtra News in Marathi) आगामी काळात सरकारकडून माती परीक्षण किंवा ड्रोन सर्वेक्षण केलं जाऊ शकतं. त्याला विरोध करण्यासाठी रिफायनरी विरोधकांनी थेट बारसू आणि सोलगावच्या कातळावरच तंबू ठोकलेत. त्यामुळे रिफायनरी विरोधातील आंदोलनाला अधिक धार येणार हे स्पष्ट दिसून येत आहे. दरम्यान, रिफायनरीचा समर्थन करणाऱ्या कोणत्याही नेत्याला गावात फिरु देणार नाही अशी भूमिका देखील यापूर्वीच विरोधकांनी घेतली होती. (Maharashtra News in Marathi)
रिफायनरी विरोधक आणि सरकार पुन्हा एकदा आमने-सामने
कोकणातील रिफायनरीला विरोध आणखी तीव्र करण्यासाठी आता विरोधक पुढे सरसावले आहेत. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा विरोध करायचा झाल्यास, आंदोलन करायचं असल्यास या उभारलेल्या तंबूमध्येच रिफायनरी विरोधक आपलं आंदोलन करणार आहेत. त्याची तयारी त्यांनी आत्तापासूनच केलीय. त्यामुळे कोकणात आता रिफायनरी विरोधक आणि सरकार पुन्हा एकदा आमने-सामने येऊ शकतात.
रिफायनरी विरोध करण्यासाठी बाससू आणि सोलगावमधील ग्रामस्थ एकवटले आहे. आपला विरोध कायम ठेवण्यासाठी थंडीत कातळावरच तंबू ठोकून आंदोलनाची तयारी सुरु केली आहे. रिफायनरी विरोधकांनी थेट बारसू आणि सोलगावच्या कातळावरच तंबू ठोकल्याने हे आंदोलन चिघळण्याची शक्यता अधिक आहे. तसेच कोणताही प्रकारचा विरोध करायचा झाल्यास युवा आंदोलक पुढे सरसावलेत. ठाण मांडण्यासाठी रिफायनरी विरोधकांनी इथेच जेवणाची सोय देखील केली आहे. भविष्यात रिफायनरीचं कोणतंही काम झाल्यास याच ठिकाणी राहून त्याला विरोध केला जाणार आहे.
रिफायनरी होऊ नये असा ग्रामपंचायतींचा ठराव
कोकणपट्ट्यात पुन्हा एकदा रिफायनरी प्रकल्पाला विरोध होताना दिसत आहेत. बारसू, सोलगाव, धोपेश्वर या परिसरात होऊ शकणाऱ्या रिफायनरी प्रकल्पाबद्दल इथल्या ग्रुप ग्रामपंचायतीत विरोधात मतदान केले. तसेच या मतदानातलं बहुमत हे रिफायनरीच्या विरोधात गेल्यानंतर या ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये रिफायनरी होऊ नये असा ठराव करण्यात आला. असाच विरोधातला ठराव या प्रकल्पक्षेत्रात येऊ शकणाऱ्या अन्य काही ग्रामपंचायतींमध्ये झाला आहे.
प्रकल्पाला भाजपचे समर्थन, मात्र ग्रामस्थ आक्रमक
दरम्यान, याआधी राजापूर येथील नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पाचा मुद्दा तापला होता. याला तीव्र विरोध झाल्यानंतर हा प्रकल्प दुसरीकडे हलविण्यात आल्याची घोषणा महाविकास आघाडी सरकारने केली होती. हा प्रकल्प रायगडमध्ये होणार असे सांगितले गेले. मात्र, त्यानंतर पुढे काहीही हालचाल सुरु झालेली नाही. आता रिफायनरीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. एकीकडे या प्रकल्पाला लोकांचा विरोध आता मावळत असल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे. पण दुसरीकडे, भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव नीलेश राणे यांना या प्रकल्पाच्या मुद्द्यावरून नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागला होता. तर पालकमंत्री आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ग्रामस्थांची भेट घेऊन हा प्रकल्प मार्गी लागावा असे प्रयत्न केलेत. त्यांनी स्थानिक आमदारांशी बोलणी केली. मात्र, आता होणार विरोध यामुळे राजकीय नेते काय निर्णय घेणार याची उत्सुकता आहे.