Shivsena : गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या राजकीय गोंधळामुळे राज्यातील वातावरण तापलं होतं. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे आणि शिंदे गटातील लढाई आणखीनच तीव्र झाल्याचं पहायला मिळत असतानाच उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवलं आहे. त्याचबरोबर शिवसेना नावावर देखील पोटनिवडणूक लढवता येणार नाही. त्यामुळे ठाकरेंची 'शिवसेना' इतिहासजमा होणार का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंधेरी पोटनिवडणूक आता धनुष्यबाण चिन्हावर लढवता येणार नाही. महत्त्वाचं म्हणजे शिवसेना पक्षाचं नावदेखील दोन्ही गटांना वापरता येणार नाही. नव्या चिन्हासाठी सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत दोन्ही गटांना आयोगाला पर्याय द्यावे लागणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता ठाकरे आणि शिंदे यांच्यासमोर पर्याय काय असेल, यावर सध्या जोरदार चर्चा होताना दिसत आहे.


ठाकरेंचं चिन्ह काय?


सुरूवातीपासून धनुष्यबाण चिन्हावर कायम असलेले उद्धव ठाकरे यांनी नुकतीच सावध भूमिका घेतली होती. निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्याने आता ठाकरे गटाने ढाल-तलवार किंवा गदा या चिन्हावर लढण्याची तयारी ठेवली होती. त्यामुळे आता ठाकरे यांच्याकडे ऑप्शन बी हाच एक पर्याय असणार आहे. त्यामुळे ठाकरे गट कोणता पर्याय निवडणार?, असा सवाल आता उपस्थित केला जातोय.


आणखी कोणते पर्याय ?


निवडणूक आयोगाने जारी केलेल्या निवडणूक मुक्त चिन्हांमध्ये 197 मुक्त चिन्हांचा समावेश आहे. यात एअर कंडीशनर, दुर्बीण, कॅन, बिस्कीट, कपाट, सफरचंद, नारळाची बाग, कॅमेरा, ड्रील मशीन, हेलिकॉप्टर, कडी, भुईमूग, गॅस शिगडी, भेटवस्तू, खाट, सेफ्टी पीन, विहीर, भालाफेक, लिफाफा, चिमटा, जहाज, झोपाळा, टूथ ब्रश, टूथ पेस्ट, फणस, ग्रामोफोन, आइस्क्रीम, पॉकीट, ट्रक, चावी, चप्पल, बॅटरी टॉर्च, गॅस शेगडी आदी चिन्हांचा समावेश आहे.


आगामी अंधेरी पोटनिवडणुकीसाठी तात्पुरतं शिवसेनेचं चिन्ह गोठवण्यात आलंय. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हे चिन्ह शिवसेनेला दिलं होतं. मात्र, आता शिवसेनेच्या अस्मितेशी जोडलं गेलेलं चिन्ह आणि नाव वापरता येणार नसल्याने आता उद्धव ठाकरे यांना मोठा दणका बसला आहे.