मुस्तान मिर्झा, झी मीडिया, उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यात शिवसेनेत मोठी बंडखोरी पहायला मिळत आहे. शिवसेना बंडखोरी रोखण्यात अपयशी ठरली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवाराची डोकेदुखी वाढली आहे. उस्मानाबाद मतदारसंघात शिवसेनेत मोठी फूट पाहायला मिळत आहे. या मतदारसंघातुन शिवसेनेने पालकमंत्री तानाजी सावंत आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या गटातील कैलास पाटील यांना उमेदवारी दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कैलास पाटील यांनी अडीच वर्षांपूर्वी राष्ट्रवादीतुन शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांना पक्षाकडून जिल्हा परिषदेचं तिकीट, जिल्हाप्रमुख पद आणि आता उस्मानाबाद मतदारसंघातुन उमेदवारी दिली आहे. त्यामुळे निष्ठावंत शिवसेनेचे नेते नाराज झाले होते. त्यामुळे शिवसेनेतून सेनेचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संजय दुधगावकर आणि संजय निंबाळकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. 


संजय निंबाळकर यांना लगेच राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्याचबरोबर 30 वर्षांपासून शिवसेनेत असलेले उपजिल्हाप्रमुख अजित पिंगळे यांनी बंडखोरी करत कैलास पाटील यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांचा कळंब- उस्मानाबाद या दोन्ही तालुक्यात चांगलंच जनसंपर्क आहे. त्यामुळे कैलास पाटील यांच्यासाठी अजित पिंगळे यांची उमेदवारी डोकेदुखी ठरणार आहे.


तर परंडा मतदारसंघातुन सलग तीन वेळेस निवडून आलेले राष्ट्रवादीचे राहुल मोटे यांना आव्हान देण्यासाठी शिवसेनेचे पालकमंत्री तानाजी सावंत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचे भूम तालुकाप्रमुख म्हणून काम करत असलेले सुरेश कांबळे यांनी बंडखोरी करत वंचित कडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.


भाजपचे लातूरचे पालकमंत्री यांचे मेहुणे आणि वाशी तालुक्याचे शिवसेनेचे नेते संकेत चेडे यांनीही बंडखोरी करत सावंत यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे कांबळे आणि चेडे हे पालकमंत्री सावंत यांच्यासाठी डोकेदुखी ठरणार आहेत. 


तर दुसरीकडे जिल्ह्यात खासदार ओमराजे यांनी तुळजापूर मतदारसंघातुन भाजपचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांच्याविरोधात मोर्चा उघडल्याने भाजपचे कार्यकर्ते शिवसेनेचं काम करताना दिसत नाही.