ज्ञानेश्वर पतंगे, झी 24 तास, उस्मानाबाद  : दररोजच्या अन्नातील महत्वाच्या घटकापैकी एक म्हणजे दूध. आपण आपल्या आहारात दुधाचा समावेश करतो. साधारणपणे आपण 70 ते फार 80 रुपये प्रति लीटर या दराने दूध खरेदी करतो. पण तुम्हाला कोणी सांगितलं की एका लीटर दुधाचा भाव हा चक्क 10 हजार रुपये आहे. एकतर हा दर ऐकून तुम्हाला धक्का बसेल, किंवा तुम्ही समोरच्याला काय गाढवणपणा करतोय, असं म्हणाल. पण हा शुद्ध 'गाढव'पणाच आहे. उस्मानाबादमध्ये गाढविणीच्या एका लीटर दुधाला 10 हजार रुपये प्रति लीटर इतका भाव मिळतोय. (Osmanabad donkeys milk is being sold at 10 thousand rupees per liter) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा शहरात गाढविणीचं दूध चक्क दहा हजार रुपये लिटरने विकलं जातंय. विशेष म्हणजे हे दूध भोंगा लावून विकलं जातंय. उमरगा शहरातील गावठाण. या ठिकाणी पाल ठोकून नांदेड जिल्ह्यातील भोकरचं धोत्रे कुटुंबीय राहतात. त्यांच्याकडे २० गाढविणी आहेत. या गाढविणीच धोत्रे कुटुंबाचं उपजीविकेचे साधन आहे. 



गाढविणीचं दूध लहान मुलांसाठी तसंच दमा आणि न्यूमोनियासाठी गुणकारी असल्याचं मानलं जातं. त्यामुळे या दुधाला विशेष मागणी असते. गाढविणीचं दूध उमरगा शहरात सध्या भोंगा लावून विकलं जातंय. विशेष म्हणजे घरासमोरच दूध काढून विक्री केली जातेय. 10 मिली लीटर दुधासाठी 100 रुपये मोजावे लागतात. सध्या कोरोनाचा काळ आहे. त्यामुळंही दुधाची मागणी वाढली आहे.


मागील २ ते ३ वर्षांपासून नांदेड भागातून ही लोकं उमरगा भागात दूध विक्रीसाठी येतायेत. गाढविणीचं दूध उपयुक्त असल्याचं उमरगावासियांचं म्हणणं आहे.
गाढविणीच्या दुधात व्हिटॅमिन डी (Vitamin D) मात्रा अधिक आहे. सौंदर्य प्रसाधनांमध्येही गाढविणीच्या दुधाचा वापर केला जातो. गाय, म्हैस आणि शेळीच्या दुधा इतकंच हे दूध सकस असल्याचं सांगितलं जातं.


दुधाला पूर्णान्न म्हटलं जातं. निरोगी आयुष्यासाठी दूध प्यायलाच हवं. लहान मुलांसाठी तर आईचं स्तनपान अमृतासमानच आहे. त्यात आता गाढविणीच्याही दुधाची भर पडलीय.