अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे : पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 'जयकर ग्रंथालया'च्या हिरक महोत्सवी वर्षाला सुरवात झालीये... पंडित नेहरू यांच्या हस्ते पायाभरणी झालेल्या या ग्रंथालयाचं बांधकाम 1956 साली सुरू झालं होतं.


साहित्य खजिना


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तब्बल साडेतीन लाख पुस्तकं... दीड लाखांहून अधिक नियतकालिकं... साडे आठ हजारांहून अधिक दुर्मिळ हस्तलिखित... कित्येक दुर्मिळ पत्रांचा संग्रह... विद्यापीठाचे सर्व 8800 प्रबंध... हा आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील जयकर लायब्ररीचा 'साहित्य खजिना'...


'ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट'


'ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट' अशी ओळख असणाऱ्या पुण्यात देशातूनच नाही तर परदेशातूनही विद्यार्थी शिकायला येतात. त्यामध्येही विद्यापीठातून शिक्षण घेणाऱ्यांची संख्या मोठी... यातील कित्येकांच्या विद्यार्थी ते संशोधक या प्रवासाची साक्ष देते ती जयकर लायब्ररी. 27 नोव्हेंबर 1958 साली विद्यापीठाच्या आवारातील या वास्तूचं उदघाटन झालं... आणि पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू मुकुंद जयकर यांचं नाव या वास्तूला देण्यात आलं. 


तीन मजली दगडी इमारतीचं बांधकाम ग्रंथालयाला अनुसरूनचं करण्यात आलंय. या वास्तूमधील वाचनालय, आंबेडकर दालन, आणि इतर विभाग आपलं लक्ष वेधून घेतात. वाचनालयात करण्यात आलेली प्रकाश योजना,  लाकडी काम आणि वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम हे अभ्यासात एकाग्रता साधता यावी यासाठी विशेष करण्यात आलंय.


डिजीटायझेनचा वापर...


गेल्या 60 वर्षात या लायब्ररीमध्ये लाखो पुस्तकांची भर पडलीय. न.चि.केळकर यांना गांधी आणि नेहरूंनी लिहिलेल्या पत्रांपासून ते माडगूळकरांच्या हस्तलिखित कविता अशा अनेक दुर्मिळ आणि मौल्यवान साहित्याची भर या लायब्ररीमध्ये पडत गेली. यामध्ये 225 वर्षांपूर्वीच्या हस्तलिखितांचाही समावेश आहे. या दुर्मिळ ठेव्याची जपणूक करण्यासाठी त्याचं डिजीटायझेनशही करण्यात आलंय. पुस्तकांसोबतच जयकर लायब्ररीमध्ये पंडीत भीमसेन जोशी, बिस्मिल्ला खान यांची अनेक रेकॉर्डिंग जतन करण्यात आली आहेत. 


विद्यापीठातील विद्यार्थ्यांसोबतच  बाहेरील संशोधक दुर्मिळ संदर्भांसाठी जयकर लायब्ररीची वाट धरतात. त्यामुळे जयकर लायब्ररी म्हणजे केवळ  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्याच नाही शैक्षणिक क्षेत्रासाठी बोधिवृक्ष ठरते आहे.