`चिदंबरम तुरुंगात चटईवर झोपतात; बसायला साधी खुर्चीही नाही`
उच्च न्यायालयाने चिदंबरम यांना ३ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती.
सातारा: आयएनएक्स मीडिया गैरव्यवहारप्रकरणात तुरुंगात असलेल्या पी. चिदंबरम यांना तुरुंगात अत्यंत वाईट परिस्थितीला तोंड द्यावे लागत असल्याचे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. ते रविवारी दक्षिण कराडमधील सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपकडून 'ईडी'च्या माध्यमातून विरोधकांच्या करण्यात येणाऱ्या गळचेपीवर भाष्य केले.
यावेळी त्यांनी सांगितले की, मी काही दिवसांपूर्वीच दिल्लीत मनमोहन सिंग यांना भेटलो. यावेळी त्यांनी पी. चिदंबरम यांच्या अवस्थेविषयी सांगितले. मनमोहन सिंग आणि काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी तिहार तुरुंगात जाऊन पी. चिदंबरम यांनी भेट घेतली होती. तेव्हाच्या चिदंबरम यांच्या अवस्थेविषयी मनमोहन सिंग यांच्याकडून समजले.
पी. चिदंबरम यांना तुरुंगात झोपायला फक्त चटई दिली आहे. त्यांची उशीही काढून घेण्यात आली. चिदंबरम यांना खाली बसताना त्रास होता. यासाठी त्यांनी खुर्ची मागवली होती. मात्र, तीदेखील काढून घेण्यात आली. रोजच्या जेवणात त्यांना पातळ जाळ आणि सुकलेली भाकरी खायला मिळते, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
आयएनएक्स मीडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने २१ ऑगस्ट रोजी पी. चिदंबरम यांना अटक केली होती. यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. या काळात पी. चिदंबरम यांनी जामीनासाठी बरेच प्रयत्न केले. मात्र, न्यायालयाने वेळोवेळी त्यांच्या न्यायालयीन कोठडीला मुदतवाढ दिली होती. काही दिवसांपूर्वी झालेल्या सुनावणीवेळी दिल्ली उच्च न्यायालयाने चिदंबरम यांना ३ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती.
चिदंबरम झाले, डी. के. शिवकुमार झाले, चंद्राबाबू झाले, शरद पवार झाले. उद्या मला ईडीची चौकशी लावून तुरुंगात टाकले तर आश्चर्य वाटून घेऊ नका. माझी तयारी आहे, मी घरी तसे सांगून ठेवलेय, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले.
दरम्यान, यावेळी त्यांनी विधानसभा का लोकसभा निवडणूक लढवणार, याविषयी स्पष्टपणे सांगितले नाही. मात्र, जो निर्णय होईल तो कराडच्या मतदारांना केंद्रस्थानी ठेवूनच होईल, असे त्यांनी सांगितले.