पडळकर-राष्ट्रवादी वाद, मुश्रीफांच्या आव्हानाला चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर
गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातला वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.
कोल्हापूर : गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातला वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या आव्हानाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. कुणी कुणाला धमकी द्यायची गरज नाही, आम्ही कुणाला घाबरत नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
'सुरुवात कोणी केली हे महत्त्वाचं नाही, पण महाराष्ट्राची राजकीय संस्कृती बिघडली आहे. तुम्ही जे पेरता तेच उगवतं, एकत्र बसून बिघडलेली राजकीय संस्कृती नीट केली पाहिजे. अन्यथा याचा शेवट कुठंही होऊ शकतो,' अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली.
'पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यावर कशा पद्धतीने टीका केली जाते. आम्हाला कोणी चंपा म्हणतं, कोण टरबूज म्हणतं, हे कसं चालतं?' असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार हे महाराष्ट्राला झालेले कोरोना आहेत, अशी आक्षेपार्ह टीका केली होती. पडळकर यांच्या या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली. राष्ट्रवादीने पडळकरांच्याविरोधात राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केलं. तसंच पडळकरांनी माफी मागावी, अशी मागणीही केली.
पडळकर यांच्यावर टीका करताना हसन मुश्रीफ यांनीही आक्षेपार्ह भाषेचा वापर केला. हसन मुश्रीफ यांनी पडळकर यांच्या गोप्या असा एकेरी उल्लेख केला. तसंच आम्ही अशा शिव्या देऊ की झोपा लागणार नाहीत, असा इशाराही मुश्रीफ यांनी दिला.
फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हे पडळकरांचे बोलवीते धनी आहेत, असा आरोपही मुश्रीफ यांनी केला. नथुराम गोडसेचं ज्या पद्धतीने उदात्तीकरण केलं जातं, त्याच पद्धतीने गोपीचंद पडळकर यांचं उदात्तीकरण केलं जातंय, अशी टीकाही मुश्रीफ यांनी केली. जर कायदा सुव्यवस्था बिघडली, तर याला विरोधी पक्षच जबाबदार असेल, असा इशाराही मुश्रीफ यांनी दिला आहे.
दरम्यान पडळकर यांचं हे वक्तव्य चुकीचं असल्याचं स्पष्टीकरण भाजपने दिलं. तसंच देवेंद्र फडणवीस यांनीही गोपीचंद पडळकर यांना याबाबत समज दिली.