मुस्तान मिर्झा, झी मीडिया, उस्मानाबाद : पदमसिंह पाटील आणि त्यांचे सुपुत्र यांच्या भाजप प्रवेशाने जिल्ह्यातील राजकारणात काय बदल होणार आहे? भाजपात गेल्याने पाटील यांची ताकद वाढली का? पाटील यांच्यामुळे भाजपाचा कमळ उस्मानाबादमध्ये फुलणार का? भाजपा शिवसेनेला शह देऊ पाहतंय का?.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शरद पवार क्वचितच भडकतात. मात्र त्यांना पद्मसिंह पाटील घराण्याच्या भाजपा प्रवेशाबाबत विचारल्यावर ते असे भडकले. त्याला कारणही तसंच आहे. उस्मानाबाद जिल्ह्याचं राजकारण गेलं अर्ध शतक या घराण्याभोवती फिरतंय. तब्बल ४६ वर्ष पद्मसिंह पाटील पवारांची सावली होते. आता ते भाजपावासी झाल्यामुळे जिल्ह्याचं राजकारण बदलणार आहे. राष्ट्रवादीला आपला ताकद गमवायची नाही. त्यामुळेच येत्या १५ दिवसांत स्वतः पवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.


भाजपात गेल्यानंतर पद्मसिंहांची मुख्य स्पर्धा आहे ती मित्रपक्ष शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याशी. लोकसभेला ओमराजेंनी राणा जगजितसिंह पाटील यांचा दारुण पराभव केला. पाटील कोणत्याही पक्षात असले तरी त्यांचं राजकारण संपवणारच, असा विडा ओमराजेंनी उचलला आहे.


पाटील घराण्याच्या प्रवेशामुळे चौथ्या क्रमांकावर असलेल्या भाजपाची ताकद वाढणार आहे. त्यामुळे आगामी काळात भाजपा विरुद्ध शिवसेना असाच संघर्ष कायम राहील, असं चित्र दिसतंय. युती झाली तर निवडणुकीचे रंग काय असतील याचीही उत्सुकता आहे. 


दुसरीकडे पाटील भाजपात गेल्यानं त्यांचे अनेक कार्यकर्ते दुखावलेत. त्यांनी राष्ट्रवादीतच राहण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय त्यांचे दलित आणि मुस्लीम मतदारही संभ्रमात आहेत.


पवारांचे जवळचे नातलग भाजपावासी झाल्यानं राष्ट्रवादीला झालेला मानसिक आघात मोठा आहे. मात्र यामुळे भाजपाचा फायदा होणार की पाटील घराण्याचा हे काळच ठरवेल.