जेव्हा विद्यार्थ्यांची ४८ वर्षांनंतर भेट होते तेव्हा !
रत्नागिरी जिल्ह्यात ४८ वर्षांनंतर विद्यार्थ्यांचा अनोखा उत्साह पाहायला मिळाला.
मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यात ४८ वर्षांनंतर विद्यार्थ्यांचा अनोखा उत्साह पाहायला मिळाला. हे विद्यार्थी माजी होते. वयाची साठी पार केलेल्या मित्र-मैत्रिणींमध्ये एकमेकांना भेटल्यानंतर विद्यार्थी दशेतील जोश आणि उत्साह पाहायला मिळाला. निमित्त होते ते एका स्नेह मेळाव्याचे.
संगमेश्वर तालुक्यातील पैसाफंड हायस्कूलचे हे सगळे विद्यार्थी. १९६९-१९७० ची बॅच. वयाची साठी ओलांडल्यानंतर हे माजी विद्यार्थी प्रथमच ४८ वर्षानंतर भेटले. त्यावेळी त्यांच्या हृदयातील स्नेहभाव बोलण्यातून आणि भेटण्यातून ओसंडू वाहत होता. या मित्र परिवाराने एकत्र येवून आपल्या शालेय आठवणींना उजाळा दिला आणि आपल्या गतभूतकाळात रमून गेलेत. सुखद क्षणांचा नव्याने आनंद यावेळी त्यांनी घेतला.
यावेळी सकाळी प्रथम दीपप्रज्वलाने स्नेहमेळाव्याला सुरुवात झाली. प्रत्येकांनी आपले मनोगत व्यक्त केले. आपल्या शालेय आणि आपल्या यशस्वी वाटचालीला उजाळा दिला. दिवसभर हा स्नेहमेळावा चालला. दरम्यान, ४८ वर्षानंतर हे माजी विद्यार्थी एकत्र येण्यासाठी व्हॉटस्अॅपची मदत झाली. माजी विद्यार्थी परिवाराला एकत्र आणण्यासाठी छाया शेरे, माया देसाई, शैला भिडे आणि प्रकाश सुर्वे यांनी प्रयत्न केले. त्यांचेही सर्वांनी आभार व्यक्त केले.