पाकिस्तानच्या जनतेला भारतीयांबद्दल आपुलकी : शरद पवार
भारत - पाकिस्तान संबंधाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलेय.
पुणे : भारत - पाकिस्तान संबंधाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलेय. पाकिस्तानमधील जनतेला भारतीयांबद्दल आपुलकी आहे. पाकिस्तानची जनता भारताशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतात, असे ते म्हणाले. पुण्यात एका कार्यक्रमात पवार यांनी हे भाष्य केलेय.
पाकिस्तान म्हटले दहशतवादाचे बीज रोवणारा देश. हल्ला आणि दहशतवाद इतकेच आपल्यासमोर येते. पण पाकिस्तानमध्ये तसे चित्र नाही. पाकिस्तानची सर्वसामान्य जनतेला भारतीयांबद्दल आपुलकी आहे. याचे उदाहरण देताना पवार यांनी सांगितले. मी बीसीसीआयचा अध्यक्ष असताना पाकिस्तानमध्ये गेलो होतो. सामना संपल्यावर आम्ही एका हॉटेलमध्ये गेलो. त्या हॉटेल मालकाने आमच्याकडून पैसे घेतले नाही. तुम्हाला मी टीव्हीवर बघितले होते. तुम्ही आमचे पाहुणे असल्याने मी पैसे घेणार नाही, असे त्याने सांगितल्याचे पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.
पवारांची मोदी आणि राज्य सरकारवर टीका
लोकांना आज चांगले पर्याय, चांगले नेतृत्व दिसत नाही. त्यामुळे जनतेत अस्वस्थता आहे. नोटबंदीचा निर्णय घ्यायचा अधिकार पंतप्रधानांना नाही. मात्र तरीही अशा प्रकारचा निर्णय मोदींनी घेतला. यामुळे नक्षलवाद आणि दहशतवाद संपेल, अशी दिशाभूल करण्यात आली, अशी टीका त्यांनी केली. तसेच राज्यात शेतकरी आत्महत्या हा गंभीर विषय आहे. मात्र, सरकार बघ्याची भूमिका घेत आहे. मराठा आरक्षणाचा निर्णय घेताना दुसऱ्या समाजाच्या आरक्षणाला धक्का लावू नये, हीच आमची भूमिका आहे, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, लोकमान्य टिळकांनी काँग्रेस सर्वसामान्य माणसाच्या हाती आणण्यासाठी प्रयत्न केले. लोकांना एकत्र आणायचे काम त्यांनी केले. देशाला खऱ्या अर्थाने स्थैर्य लाभले ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे. त्यांनी समाजातील शेवटच्या घटकाला संविधानात अधिकार दिला. तर संसदीय लोकशाही पद्धतीला दिशा देण्याचे काम जवाहरलाल नेहरु यांनी केलेय. १९७७ च्या निवडणुकीने देशाला वेगळी दिशा दिली, असंही त्यांनी स्पष्ट केले.