COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पालघर : पालघर आणि भंडारा गोंदिया पोटनिवडणुकीसाठी रविवारी मतदान होतंय. पालघरची पोटनिवडणूक प्रचारात शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी रंगल्या. अखेरच्या टप्प्यात तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ऑडिओ क्लीपवरुन दोन्ही पक्षांमध्ये घमासान सुरु असल्याचे पाहायला मिळालं.


मुख्यमंत्र्यांच्या वादग्रस्त ऑडिओ क्लिपप्रकरणी काँग्रेस आणि बहुजन विकास आघाडीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवली आहे. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत आणि बहुजन विकास आघाडीच्या नेत्या तसेच, माजी आमदार मनिषा निमकर यांनी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्याकडे तक्रारीचं निवेदन दिलं आहे. मात्र, क्लिप ऐकवणाऱ्या शिवसेनेकडून केवळ आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेनेने तक्रार का केली नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. 


तर तिकडे भंडारा गोंदियात मुख्यमंत्र्यांनी धान तुडतुडे नुकसानग्रस्तांसाठी निधीची घोषणा केली. त्यानंतर जिल्हा कोषागार रात्रभर सुरु असल्याने राष्ट्रवादीने आचारसंहिता भंग झाल्याचा आरोप केला. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी कोणता उमेदवार निवडून येणार याची उत्सुकता लागलीय. 


मतदानाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही ठिकाणी प्रशासनाकडून तयारी करण्यात येतेय. सकाळी सात ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी तालुका नक्षलग्रस्त असल्यामुळे या तालुक्यात मतदानाची वेळ ही सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत ठेवण्यात आलीय. या निवडणुकीत ईव्हीएम मशीनसोबत व्हिव्हिपॅट मशिनचा वापर होणार आहे.