मुंबई : पालघर जिल्हयातील तारापूर एमआयडीसीमध्ये झालेल्या भीषण स्फोटात आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला तर ७ जण जखमी आहेत. याशिवाय अजूनही कंपनीच्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली असल्याची माहिती समोर येत आहे. या स्फोटातील मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्र्यांनी प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर केली आहे तर जखमींना संपूर्ण वैद्यकीय साहाय्य देण्याचे आदेश दिलेत.  ‘तारा नायट्रेट’ कंपनीत शनिवारी संध्याकाळी एक भीषण स्फोट झाला. एम-२ या प्लॉटमधील कारखान्यात संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास झालेल्या दुर्घटनेत कंपनीच्या मालकासह आठ कामगारांचा दुदैवी मृत्यू झाला. या स्फोटाची तीव्रता इतकी तीव्र होती की, आसपासच्या चार ते पाच किलोमीटरचे परिसर हादरला. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पालघरमधील तारापूर कोलवडे गावात तारा नाईट्रेट या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कंपनीत हा स्फोट झाला. या कंपनीमध्ये हे अमोनिअम नायट्रेट हे स्फोटक रसायन बनवले जात होते. या स्फोटामध्ये कंपनी काम करणारे कामगार आणि कंपनीचे मालक नटुभाई पटेल यांची मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या स्फोटाची तीव्रता खूप मोठी होती. स्फोटाचा आवाज २५ किलोमीटर अंतरापर्यंत डहाणू आणि पालघरपर्यंतच्या गावांमध्ये ते ऐकू आला. अनेक नागरिकांना पालघर भागात भूकंप झाल्याचा भास झाला.  मात्र, काही वेळाने स्फोटाचा आवाज असल्याचे स्पष्ट झाले.


या स्फोटाच्या धक्क्याने बाजूला बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली. या इमारती खालीही काही कामगार अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तसेच या कंपनीतील स्फोटानंतर अवशेष लगतच्या काही कारखान्यात उडाल्याने मोठय़ा प्रमाणात हानी झाली आहे. स्फोटानंतर संपूर्ण परिसराचा विद्युत पुरवठा बंद केला गेला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.