पालघरमध्ये `सत्ते पे सत्ता`! भाजप आणि शिवसेनेला धक्का!
शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू असताना, ही रस्सी मध्येच तुटेल आणि तिसराच उमेदवार निवडून येईल, असा दावा
दिनेश दुखंडे, झी मीडिया, पालघर : पालघर पोटनिवडणुकीत आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू असताना, ही रस्सी मध्येच तुटेल आणि तिसराच उमेदवार निवडून येईल, असा दावा केला जात आहे. बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी हा दावा केला आहे, या पोटनिवडणुकीत आमचाच खासदार निवडून येणार आहे, आमचं अस्तित्व आहे, आमचं राजकारण वेगळ्या पद्धतीचं आहे, आणि आम्हाला गृहीत धरू नका, असं देखील हितेंद्र ठाकूर यांनी म्हटलं आहे. वनगा खास करून चिंतामण वनगा यांचे विरोधीपक्षाशी चांगले संबंध होते, आम्ही देखील त्यांच्याविषयी काही बोलू शकलो नाही, वनगांची प्रतिमा स्वच्छ होती, पण मुलगा आणि वडील यांच्यात निवडणुकीच्या बाबतीत फरक पडेल असं हितेंद्र ठाकूर यांनी म्हटलं आहे.
पालघरमध्ये आमचा सर्वात मोठा पक्ष
हितेंद्र ठाकूर म्हणतात, पालघरमध्ये आमचा सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे आमचा क्लेम आहे. बहुजन विकास आघाडी ही पोटनिवडणूक लढवणार आणि आमचाच खासदार निवडून येणार आहे आमच्या पक्षाचं काम केलेला आमचा उमेदवार असेल, आम्हाला उमेदवार आयात- निर्यात करण्याची गरज नाही. आम्ही, भाजप आणि काँग्रेस इथं नॅचरल पक्ष आहोत. गेली अनेक वर्षे निवडणूक लढवंत आहोत. शिवसेना येथे मध्ये आलीय.
उमेदवारीसाठी 6 ते 7 जण इच्छूक
आमच्या पक्षात उमेदवारीसाठी 6 ते 7 जण इच्छुक आहेत, आमचं इथं अस्तित्व आहे. भाजपसोबत सत्तेत असणं हा वेगळा भाग आहे. याचा अर्थ कुणी आम्हाला गृहीत धरू नये. शिवसेनेचे शक्तीप्रदर्शन हे मुंबई-ठाण्याहून शिवसैनिक आणून केलं. आदिवासी भागात ते पचत नाही. अख्या महाराष्ट्रातून शिवसैनिकांना बोलावलं होतं. चिंतामण वनगा हे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. विरोधकांशीही त्यांचे चांगले संबंध होते. स्वछ प्रतिमा आणि लोकांशी चांगले संबंध होते, असं हितेंद्र ठाकूर म्हणतात.
नाराजीचा भाजपला फटका बसेल
वनगा कुटुंबियांच्या नाराजीचा भाजपला फटका बसेल. आयात उमेदवारांना स्थानिक कसे स्वीकारतील ?बुलेट ट्रेनच्या बाबतीत असलेले समज गैरसमज दूर झाले पाहिजेत. बुलेट ट्रेन लांब पल्याची हवी. बुलेट ट्रेन संपूर्ण देशात हवी फक्त पर्टीक्युलर डिस्टन्स पुरती नको. प्रकल्प राबवताना शेतकऱ्यांचे किंतु परंतु राहाता कामा नये. 10 तारखेला आमच्या पक्षाचा उमेदवार अर्ज भरणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.