कोल्हापूर : कोल्हापुरातील पंचगंगा नदी घाट परिसर आज पहाटे ५१ हजार पणत्यांनी उजळुन निघाला. निमित्त होतं त्रिपुरारी पौर्णिमेचं. बोचरी थंडी असतानाही मिणमिणत्या हजारो पणत्यांचा आनंद लुटण्यासाठी कोल्हापूरकरांनी पंचगंगा घाटावर मोठी गर्दी केली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोल्हापुरातील विविध सामाजिक सेवासंस्था आणि नागरिकांच्या वतीनं दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पंचगंगा नदी घाटावर हजारो पणत्या प्रज्वलित करुन आनंद साजरा केला जातो. 


यंदाही बोचरी थंडी असतानाही कोल्हापूरकर आवर्जुन पहाटे घाट परीसरात दाखल झाले. सुरवातीला पंचगंगा घाट परिसरामध्ये आकर्षक आणि मनमोहक अशा रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. त्यानंतर ज्योत से ज्योत मिलावो याप्रमाणे प्रत्येकजण एक एक पणती प्रज्वलित करत पंचगंगा घाट परिसर उजळुन टाकला. 


यामध्ये वृद्ध, तरुण, महिला आणि लहान मुलांच्या सहभाग होता. जोडीला भक्तीगीतांची सुरेल मैफिल आणि नयनरम्य फटाक्यांची आतषबाजी देखील होती. पंचगंगा घाट परिसरात हजारो पणत्यांनी प्रज्वलित झालेलं दृष्य मनाला मोहीत करणारं असं होतं.


त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्तानं ठिकठिकाणी दिपमाळा पेटवल्या जातात आणि मंदिरांवर दीपोत्सव साजरा केला जातो. पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरासमोर तसंच पाताळेश्वर लेणीमध्ये दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामुळे इथला परिसर लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघाला होता.