मुंबई : कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे पंचवटी एक्स्प्रेस गेल्या पाच  महिन्यांपासून बंद होती. अखेर १७४ दिवसांनी ही एक्स्प्रेस पुन्हा रुळावर धावली आहे. मनमाड —नाशिक—मुंबई ही उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्वपूर्ण आहे. आता ही ट्रेन पुन्हा सुरू झाल्याने नाशिककरांनी समाधान व्यक्त केले आहे. परंतु आता पंचवटी एक्स्पेसमधून प्रवास करण्यासाठी आरक्षण करणे बंधनकारक असणार आहे. पंचवटी एक्सप्रेसला पूर्वी जे थांबे होते तेच कायम  राहणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजपासून सुरू झालेल्या पंचवटी एक्स्प्रेसच्या आरक्षणाची सुरूवात १० सप्टेंबरपासून करण्यास सुरूवात झाली आहे.  त्यामुळे या गाडीने प्रवास करायचा असल्यास त्याचे आधीच नियोजन करावे लागणार आहे. देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रशासनाने अनेक नियम आणि अटी घालून दिल्या आहेत. 


यामध्ये, प्रवाशांना दीड तास अगोदर रेल्वेस्थानक परिसरात हजर राहावे लागणार आहे. आरक्षण असलेल्या प्रवाश्यांना या रेल्वेने प्रवास करता येणार आहे. प्रवासादरम्यान मास्क घालणे बंधनकारक असणार आहे.


पंचवटी एक्सप्रेस पुन्हा सुरू झाल्यामुळे रेल्वे प्रवासी, चाकरमाने, विद्यार्थी, उद्योजक आणि व्यावसायिकांची सोय होणार आहे. कोरोनामुळे गेल्या काही महिन्यांपासून सर्वच व्यवसाय आणि उद्योग बंद होते. त्यामुळे देशाची आर्थिक घडी देखील विस्कयली आहे. मात्र अनलॉक प्रक्रियाच्या माध्यमातून परिस्थिती पूर्वपदावर येताना दिसत आहे.