पंढरपूरला पांडुरंगाचं दर्शन आता टोकन घेऊन
तिरुपती बालाजीच्या धर्तीवर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात टोकन दर्शन सुविधा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पंढरपूर : तिरुपती बालाजीच्या धर्तीवर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात टोकन दर्शन सुविधा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. श्री विठ्ठल रूक्मिणी मंदीर समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. या निर्णयाची अंमलबजावणीसाठी भाविकांना आषाढी एकादशीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. पंढरीच्या विठूरायाच्या दर्शनासाठी येणा-या भाविकाना पद-दर्शनासाठी तास न तास दर्शन रांगेत थांबाव लागतं. दर्शन रांगेत भाविकांचा वेळ जातो. त्यामुळेच हा त्रास थांबवण्यासाठी समितीने टोकन दर्शन सुविधा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
मान्यता प्राप्त एजन्सीकडून खिडकी व्यवस्था
पंढरपूरात बसस्थानक, रेल्वे स्टेशन आणि प्रमुख ठिकाणी टोकन दर्शन सुविधेसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून मान्यता प्राप्त एजन्सीकडून खिडकी व्यवस्था केली जाईल.
रांग लावण्याचा त्रास कमी होणार
भाविक तिथं येऊन आपल्या ओळखपत्राचा वापर करून दर्शनासाठी उपलब्ध वेळ निवडतील. यामुळे दर्शन रांगेत थांबण्याचा त्रास कमी होऊन उरलेला वेळ ते पंढरपूरात पर्यटन आणि खरेदी करू शकतील. टोकन दर्शन सुविधेसाठी पददर्शन, मुख दर्शन अशा पद्धतीने वेगवेगळी टोकन उपलब्ध असतील. यामुळे दर्शनासाठी होणारा काळाबाजारसुद्धा संपणार आहे.