बीड : गोपीनाथ मुंडे गृहमंत्री असताना त्यांनी मुंबईतील गुंडगिरी आणि गँगवार संपवलं. त्याप्रमाणेच आपण बीड जिल्ह्यातील गुंडगिरी संपवल्याचं ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलं. त्यामुळे बीड जिल्ह्यासाठी आपणच गृहमंत्री असल्याचंही त्या पुढं बोलून गेल्या. या वक्तव्यामुळे पंकजा मुंडेंची गृहमंत्रिपदाची सुप्त इच्छा पुन्हा एकदा बाहेर आली. परळीतल्या गोपीनाथ गड येथे आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिरात त्या बोलत होत्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमदार सुरेश धस यांच्या भाषणाचा धागा पकडत पंकजा यांनी बीड जिल्ह्यातील दहशत, दादागिरी, गुंडगिरी संपवली असे सांगून यापुढे कोणालाही घाबरण्याची गरज नाही. चांगले काम करा आणि माझ्या पाठीशी राहा असंही आवाहन त्यांनी यावेळी केलं. 


पंकजा मुंडे यांनी यापूर्वीही अनेकदा आपल्याला गृहमंत्रिपद आवडत असल्याचं म्हटलंय. आज जिल्ह्यासाठी का होईना गृहमंत्री असल्याचं सांगून त्यांनी आपली सुप्त इच्छा बोलून दाखवली.


याआधीही, 'लोकांच्या मनातील मुख्यमंत्री मीच' या त्यांच्या वक्तव्यानं त्यांच्या मनातील मुख्यमंत्री बनण्याची इच्छा उघड केली होती. मी मुख्यमंत्री होईन की नाही, हे माहिती नाही, पण मी मुख्यमंत्री व्हावे, ही लोकांची इच्छा आहे, असं पंकजा मुंडे यांनी मे २०१५ मध्ये पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना म्हटलं होतं...  व्हिडिओ पाहा :- 'लोकांच्या मनातील मुख्यमंत्री मीच'- पंकजा मुंडे