आता मी भाजपची सामान्य कार्यकर्ता - पंकजा मुंडे
पंकजा मुंडे यांची झी 24 तासला एक्सक्लुझिव्ह मुलाखत
बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे या नाराज असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होती. त्यानंतर त्य़ांनी फेसबूकवर एक पोस्ट टाकली. त्यामुळे त्या भाजप सोडणार का अशी राजकीय चर्चा सुरु झाली. पंकजा मुंडे यांनी 12 डिसेंबरला आपली भूमिका जाहीर करणार असल्याचं म्हटल्यानंतर या तारखेकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं. गोपीनाथ गडावर झालेल्या मेळाव्य़ात पंकजा मुंडे यांनी अनेक मुद्द्यांवर जाहीर प्रतिक्रिया दिली. पण मी भाजपमध्येच राहणार असं देखील स्पष्ट केलं होतं.
आज झी 24 तासला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत देखील त्यांनी अनेक गोष्ट स्पष्ट केल्या. पंकजा मुंडे यांनी म्हटलं की, 'गोपीनाथ गडावरील भाषण माझं भाषण स्वयंस्पष्ट आहे. बऱ्याच गोष्टी मी त्या दिवशी स्पष्ट केल्या. पराभव झाला त्याच दिवश लगेचच मी माध्यमासोबत बोलून सांगितलं होतं की, पराभवाची जबाबदारी माझी आहे. एकमेकांवर बोट न दाखवता पुढच्या कामाला लागा असं देखील कार्यकर्त्यांना सांगितलं होतं. मी आता लोकप्रतिनिधी नाही. त्यामुळे आता भविष्यातील प्रवास कसा असावा यासाठी मी केलेली फेसबूक पोस्ट होती. त्यानंतर मी स्पष्ट केलं की, हा माझ्या वडिलांचा पक्ष आहे. तो मी सोडणार नाही.' असं पकंजा मुंडे यांनी झी 24 तास सोबत बोलतांना म्हटलं आहे.
'मी विधीमंडळात नाही याचं अनेकांना दु:ख वाटत आहे. ही माझी कमाई आहे. माझा रोष कोणावर ही नाही. मी कोणाला दोष देणार. मी स्वयंभू आहे. माझी जबाबदारी कोणी घेतली नव्हती तर कोणावर कसा रोष असणार. मी विजयी झाले हे माझे क्रेडिट असेल तर पराभूत झाले हे दुसऱ्याचं क्रेडिट कसं असू शकतं.'
'माझ्या भविष्याचा प्रवास, आता मी भाजपची सामान्य कार्यकर्ता आहे. मुंडे साहेब गेल्यानंतर मी राजकारणात माझे पाय मजबूत केले. विधानसभेच्या पराभवाने मी कमी होणार नाही. मराठावाडा दुष्काळग्रस्त व्हावा यासाठी काम करणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून मराठवाड्याच्या दुष्काळाचा विषय प्राधान्याने घ्यावा यासाठी विनंती करणार आहे. मराठवाड्य़ाचं हक्काचं पाणी त्यांना मिळत नाही. त्यासाठी प्रयत्न करणार आहे. मागच्या 5 वर्षात आम्ही सिंचनाचे प्रयोग केले. जलसंधारण्याची कामे केली.'
'एकनाथ खडसे, तावडे, बावनकुळे, गिरीष महाजन मला भेटालया आले. आमचे कौटुंबिक नाते आहे. पुढे काय करायचं याची चर्चा केली. उदास होणं नैसर्गिक असतं.'
'1980 साली मुठभर लोकांचा पक्ष वाटायचा. लोकांना पक्ष माहित नव्हता. अनेक नेते जनतेमध्ये गेले. पण हे परत होऊ नये. माझ्या पराभवाची चर्चा आधीपासून सुरु आहे. खडसे साहेबांबाबत मागील 5 वर्षापासून चर्चा सुरु आहेत. मेहता, तावडे, बावनकुळे यांना तिकीट नाही दिलं. हे काही नवीन नाही. आमच्याबद्दल एक चुकीची प्रतिमा तयार केली गेली. त्यामुळे आम्हाला त्यासाठी मेहनत घ्यावी लागेल. सत्य नसेल पण लोकांमध्ये तसं गेलं असेल तर त्यावर काम केलं पाहिजे.'