धनंजय मुंडेंच्या `त्या` क्लीपमुळे पंकजाताईंना चक्कर आली- सुरेश धस
गेल्या काही दिवसांपासून बीडमध्ये अनेकांच्या मोबाईलवर एक क्लीप फिरत आहे.
बीड: भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी शनिवारी परळी येथील प्रचारसभेवेळी व्यासपीठावरच चक्कर आली. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असली तरी डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. या सगळ्या प्रकारानंतर भाजप नेते सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर आगपाखड केली. गेल्या काही दिवसांपासून बीडमध्ये अनेकांच्या मोबाईलवर एक क्लीप फिरत आहे. या क्लीपमध्ये धनंजय मुंडे यांनी पंकजांविषयी आक्षेपार्ह विधान केल्याचे ऐकायला मिळत आहे. ही क्लीप पाहूनच हळव्या स्वभावाच्या पंकजाताईंना चक्कर आल्याचा आरोप धस यांनी केला.
या क्लीपमध्ये धनंजय यांनी पंकजांबद्दल अतिश्य घाण भाषा वापरली आहे. ते स्वत:च्या बहिणीबद्दल असे कसे बोलू शकतात. हीच राष्ट्रवादीची संस्कृती आहे का, असा सवालही धस यांनी विचारला.
गेल्या अनेक दिवसांपासून पंकजा राज्याच्या विविध भागांमध्ये प्रचार करत फिरत आहेत. आजदेखील सकाळपासून त्या प्रचारात व्यग्र होत्या. परळीतील सभेनंतर त्यांचा प्रचार संपणार होता. या सभेत भाषण केल्यानंतर पंकजा मुंडे व्यासपीठावरच उभ्या होत्या. तेव्हा पंकजा मुंडे यांना दरदरून घाम यायला लागला आणि त्या खाली बसल्या. यावेळी स्टेजवर उपस्थित असलेले कार्यकर्ते त्यांच्या मदतीला धावले. कार्यकर्त्यांनी पंकजा यांच्या तोंडावर पाणी मारून आणि हवा घालून त्यांना शुद्धीवर आणले.
यंदा परळी मतदारसंघात पंकजा मुंडे यांच्यासमोर धनंजय मुंडे यांचे आव्हान आहे. पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे दोन्ही नेते परळीत आले होते. तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांनीही परळीतील प्रचारात स्वत:ला झोकून दिले होते. त्यामुळे ही लढत अटीतटीची होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.