प्रीतम यांना केंद्रात मंत्रीपद न मिळाल्याने मुंडे भगिनी नाराज, या चर्चेवर पत्रकार परिषदेत पंकजा मुंडे म्हणतात...
माझं लोकांशी नातं आहे,संबंध नाही, हे नातं कधीच तुटत नाही, संबंध तुटू शकतात अशा शब्दात लोकांचा पाठिंबा
मुंबई : प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रीपद न मिळाल्याने मुंडे भगिनी नाराज असल्याच्या जोरदार चर्चा होत्या. या चर्चा सुरू असतानाच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतलीये. यावेळी त्यांनी मी आणि प्रीतम मुंडे नाराज नाहीत. चुकीच्या बातम्या पसरवल्या जात असल्याचं त्यांनी म्हटलंय. "मी एवढी मोठी नाही की कोणाला मला संपवायचंय" अशा शब्दात त्यांनी चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
पत्रकार परिषदेत सुरुवातीला त्यांनी सर्वांसमोर निवड झालेल्या सर्व मंत्र्यांचं अभिनंदन केलं. भारती पवार, कपिल पाटील, ज्योतिरादित्य सगळ्यांशी बोलणं झाल्याचं त्यांनी म्हटलं. मुंडे साहेबांचा वारसा आम्हाला आहे, त्यामुळे दुसऱ्याचं चांगलं झालं याचा आम्हाला आनंद असल्याचं ही त्यांनी यावेळी सांगितलं.
मंत्रिमंडळात स्थान जरी मिळालं नसलं तरी माझं लोकांशी नातं आहे,संबंध नाही, हे नातं कधीच तुटत नाही, संबंध तुटू शकतात अशा शब्दात लोकांचा पाठिंबा अद्याप असल्याचा दावा पंकजा मुंडे यांनी केलायं.
पुढे पंकजा मुंडे म्हणाल्या, "भाजपमध्ये निर्णयाची एक पद्धत आहे, नवीन लोकांना संधी द्यायला हरकत नाही पक्षाला जर हे बरोबर वाटलं असेल. वैयक्तीक मत हे वैयक्तीक असतं ते जाहीरपणे व्यक्त करता येत नाही.
बहिण प्रीतम मुंडे यांच्याबद्दल बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, प्रीतम मुंडे या नक्कीच मेहनती आहे, तरुण चेहरा आहे. काम चांगलं आहे. मला पक्षाचा निर्णय पटतो न पटतो याचा विषय येतच नाही. याधीही निर्णय पटले आहेत.