Dasara Melava 2023: आज दसरा सण आहे दसऱ्यानिमित्त आज राज्यात मोठे राजकीय मेळावे होत आहेत. शिवसेनेच्या दोन्ही गटांचे मुंबईत आज मेळावे होत आहेत. या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची भाषणे होतील. तर, एकीकडे बीडमध्येही पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा आहे. दसऱ्याच्या दिवशी राज्यात होणाऱ्या राजकीय सभांमुळं कोण काय बोलणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. तर, अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारांचा नारळ फोडणार का? असा सवाल उपस्थित होतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला मोठी परंपरा आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मेळाव्यातील भाषणे नेहमीच गाजली. मात्र, शिंदेच्या बंडानंतर शिवसेनेत फूट पडली आणि गेल्यावर्षीपासून राज्यात शिवसेनेचे दोन मेळावे होऊ लागले. आता दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर उद्धव ठाकरे यांचा मेळावा होईल तर आझाद मैदानात एकनाथ शिंदे भाषण करणार आहेत. ठाकरे आणि शिंदे या मेळाव्यातून टीका-टिप्पणी करत आरोपांना उत्तरे देणार हे तर निश्चित आहे. तसंच, लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही काही घोषणा होण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चर्चेत आहे, अशा वेळी या दोन्ही नेते याबाबत काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. 


एकीकडे, मुंबईत राजकीय वातावरण तापलेले असताना बीडमध्येही पंकजाताई मुंडे भगवान गडावर दसरा मेळावा घेणार आहे. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी दसरा मेळाव्याची परंपरा सुरू केली होती. त्यांच्या निधनानंतर आता पंकजाताई ही परंपरा पुढे नेत आहेत. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असतानाही पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ कारखान्यावर जीएसटी वसुलीची कारवाई सुरू करण्यात आली आहे.  त्यामुळं दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे मनातली खदखद व्यक्त करणार का, अशी चर्चा सध्या सुरू आहे. त्याचबरोबर, मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या गाजत आहे. ओबीसीमधून मराठा आरक्षण देण्याची मागणी जोर धरत आहे. अशा वेळी ओबीसींच्या हितरक्षणासाठी पंकजा मुंडे काय भूमिका घेतात, याकडंही सर्वांचं लक्ष असणार आहे. 


दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फुटीनंतर आता पक्षाचे युवा आमदार रोहित पवार पुणे ते नागपूर अशी संघर्ष यात्रा काढणार आहेत. यात्रेचा आज प्रारंभ होत असून या सभेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत.