बोगद्यातून धावणार पनवेल कर्जत लोकल; मुंबई महानगरातील सर्वाधिक लांबीचा बोगदा
Panvel Karjat Railway Tunnel :मुंबई महानगरातील सर्वाधिक लांबीच्या बोगद्यातून पनवेल कर्जत लोकल धावणार आहे. पनवले आणि कर्जत ही CSMT स्टेशनवरुन दोन दिशेला असलेली शेवटची रेल्वे स्थानकं आहेत.
Panvel Karjat Railway Project : मुंबई लोकल ही मुंबईकरांची लाईफ लाईन आहे. लवकरच मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेत पनवेल कर्जत (Panvel-Karjat) हा नवा कॉरिडॉर सामील होणार आहे. पनवेल कर्जत या नव्या कॉरिडॉरचे काम वेगाने सुरु आहे. या नव्या रेल्वे मार्गावर मुंबई महानगरातील सर्वाधिक लांबीचा बोगदा उभारला (Long Tunnel) जात आहे. पनवेल कर्जत लोकल याच बोगद्यातून धावणार आहे.
पनवले आणि कर्जत ही CSMT स्टेशनवरुन दोन दिशेला असलेली शेवटची रेल्वे स्थानकं आहेत. पनवेल हे मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील शेवटचे रेल्वे स्थानक आहे. तर, कर्जत हे मध्य रेल्वे मार्गावरील उपनगरीय रेल्वेचे शेवटचे स्थानक आहे. यामुळे पनवेलहून कर्जतला जायचे असेल तर ट्रान्स हार्बर मार्गाने ठाणे स्टेशनला येवून पुन्हा मध्य रेल्वेवरील लोकल पकडावी लागते. नवीन कॉरिडोरमुळं पनवेल आणि कर्जतच्या मध्ये थेट रेल्वे केनक्टिव्हिटी मिळणार आहे. मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रकल्पाअंतर्गत पनवेल कर्जत उपनगरीय रेल्वे कॉरिडोर उभारला जात आहे. जवळपास 2,782 कोटींचा हा नव्या रेल्वे मार्गाचा मेगा प्रोजेक्ट आहे.
पनवेल कर्जत रेल्वे मार्गाचे खास वैशिष्ट्य म्हणजे मुंबई महानगरातील सर्वाधिक लांबीचा बोगदा या प्रकल्पाअंतर्गत तयार केला जाणार आहे. 29.6 किमी लांबीच्या या नव्या रेल्वे मार्गावर तीन बोगदे असून तिन्ही बोगद्यांचे खोदकामास सुरुवात झाली आहे. सध्याच्या ठाणे-दिवा दरम्यान 1.6 किमी पारसिक बोगदा हा सर्वात मोठा बोगदा आहे. भारतीय रेल्वेवरील एक किमीपेक्षा जास्त लांबीचा हा पहिला बोगदा आहे. मात्र, पनवेल-कर्जतदरम्यानच्या वावर्ले येथील 2.6 किमी लांबीचा बोगदा उभारला जात आहे.
वावर्ले येथील बोगदा हा मुंबई महानगरातील सर्वाधिक लांबीचा बोगदा ठरणार आहे. कर्जत-पनवेल दरम्यानचा सध्याचा ट्रॅक माल आणि काही मेल एक्स्प्रेस ट्रेनसाठी वापरला जातो. मात्र नवीन दुहेरी मार्गिकेमुळे मुंबई ते कर्जत दरम्यान उपनगरीय लोकल रेल्वे पनवेलमार्गे धावणार आहेत. हा मार्ग तयार झाल्यास सीएसएमटी-कर्जत मार्गे पनवेल हा रेल्वेचा नवा पर्याय उपलब्ध होईल. पनवेल-कर्जत दरम्यान पनवेल, चौक, मोहापे, चिखले, कर्जत अशी पाच स्थानके असणार आहेत.