पनवेलचे दोन धार्मिक `रॉबिनहूड` गजाआड
चोरीच्या पैशातून मूळ गावी जाऊन ते गरजूंना मदत करत असत
स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई : रॉबिन हुडच्या गोष्टी तुम्ही आतापर्यंत वाचल्या असतील. पण पनवेलच्या या चोरांची कार्यपद्धती ऐकून पोलिसही चक्रावलेत. चोरांच्या आणि चोरीच्या वेगवेगळ्या तऱ्हा तुम्ही पाहिल्या असतील पण पनवेल पोलिसांनी पकडलेल्या दोन चोरांची वेगळीच तऱ्हा समोर आलीय. पनवेलच्या या चोरांना 'देशी रॉबिनहूड' म्हणावं लागेल.
हे चोर सुट्टीच्या दिवशी चोरी करत नव्हते. सणावाराच्या दिवशीही चोरीला सुट्टी असायची. चोरीच्या पैशातून मूळ गावी जाऊन ते गरजूंना मदत करत असत, अशी माहिती पोलीस सहआयुक्त सुरेश मेकला यांनी दिलीय.
पाच वर्ष या चोरट्यांनी पनवेल परिसरात धुमाकूळ घातला होता. त्यांनी केलेले जवळपास २६ गुन्हे उघडकीस आलेत. चोरी शेवटी चोरीच असते. तिला नैतिकतेच्या कोणत्याच चौकटीत बसत नाहीत. असं असलं तरी पनवेलमध्ये सध्या या देशी रॉबिनहुड्सची चर्चा आहे.