शशिकांत पाटील, लातूर : गल्लीपासून दिल्लीपर्यंत सध्या सगळ्यांनाच वेध लागले आहेत ते देशात होणाऱ्या लोकसभा निवडणुकांचे. लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. गावागावातल्या पारांवर चर्चा रंगतेय ती निवडणुकांचीच. याच गप्पागोष्टींची झलक दाखवणारी झी २४ तासची खास मालिका 'पारावरच्या गप्पा'.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लातूर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार डॉ. सुनील गायकवाड यांच्या कामावर भाजपा कार्यकर्तेच नाराज असल्याची चर्चा इथल्या पारावर रंगेत आहे. अलिकडेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह दौऱ्यावर आलेले असताना, कार्यकर्त्यांनी जाहीरपणे आपली नाराजी बोलून दाखवली. त्यात पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर आणि खासदार गायकवाड यांच्यातला दुरावा वाढला आहे. त्यामुळं यंदा खासदारांचा पत्ता 'कट' होऊन, त्यांच्या जागी जिल्हा परिषद सदस्य सुधाकर शृंगारे यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. 


काँग्रेसच्या गोटातून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज शिरसाट यांचं नाव आघाडीवर आहे. मूळचे खान्देशातील असलेले माजी सनदी अधिकारी भा. ई. नागराळे यांच्या नावाचीही चर्चा काँग्रेसमध्ये आहे. माजी राज्यमंत्री अमित देशमुख कुणाच्या पारड्यात कौल टाकतात, यावर सगळं अवलंबून आहे. एकंदरीत सामना नवख्या उमेदवारांमध्येच रंगणार असल्याची चर्चा आहे.