दुचाकी चालवताना रिल्स बनवत होते, समोर वाहन आलं आणि... दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
परभणीतल्या घटनेने जिल्ह्यावर शोककळा, प्रजासत्ताक दिनासाठी चार विद्यार्थी एकाच दुचाकीवरुन शाळेत जात होते, पण रिल्स बनवण्याचा नादात भीषण अपघात झाला
गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी : सोशल मीडियावर (Social Media) प्रसिद्ध होण्याचं तरुणपिढीला व्यसनच लागलं आहे. छोटे छोटे रिल्स (Reels) बनवून ते सोशल मीडियावर अपलोड केले जातात. आपल्या व्हिडिओला (Video) जास्तीत जास्त लाईक्स मिळावेत यासाठी तरुणपिढीची काहीही करण्याची तयारी असते. पण कधीकधी नसतं धाडस जीवावर बेततं. अशीच धक्कादायक घटना परभणीमध्ये घडली आहे. रिल बनवण्याच्या नादात दोन शालेय विद्यार्थ्यांना जीवाला मुकावं लागलं. विद्यार्थ्यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
काय आहे नेमकी घटना?
परभणी (Parbhani) जिल्ह्यातील सोनपेठ पाथरी 548 ब राष्ट्रीय महामार्गावर प्रजासत्ताक दिनासाठी निघालेल्या विद्यार्थ्याच्या दुचाकीला जोरदार (Accident) धडक बसली. पाथरी तालुक्यातील डाकू पिपरी इथले चार विद्यार्थी एकाच दुचाकीवरून कानसुर इथल्या श्री चक्रधर स्वामी विद्यालयाकडे निघाले होते. शाळा एक किमी दूर असतांना या मुलांच्या दुचाकी समोरून येणाऱ्या वाहनाला धडक बसली. या भिषण अपघातात चारही विद्यार्थी गंभीर जखमी झाले. जखमी विद्यार्थ्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण शंतनु सोनवणे या विद्यार्थ्यांचा गुरुवारी मृत्यू झाला. तर स्वप्नील चव्हाण या विद्यार्थ्यांचा शुक्रवारी सकाळी 6 वाजता मृत्यू झाला आहे. इतर दोन गंभीर जखमीवर उपचार सुरु आहेत.
पाथरी तालुक्यातील डाकु पिंपरी इथल्या कानसुरमधल्या श्री चक्रधर स्वामी विद्यालयात नवव्या इयत्तेत हे विद्यार्थी शिकत होते. गुरुवारी प्रजासत्ताक दिन असल्याने हे विद्यार्थी दुचाकी वरून शाळेकडे जात होते, शाळा एक किमी दूर अंतरावर असतांना राष्ट्रीय महामार्गावर समोरून येणाऱ्या वाहनाला धडक बसल्याने त्यांचा जोरदार अपघात झाला. या अपघातात स्वप्नील ज्ञानेश्वर चव्हाण, योगानंद कैलास घुगे, शंतनु कांचन सोनवणे आणि राहुल महादेव पीचे हे चार ही विद्यार्थी रस्त्याच्या कडेला फेकले गेले.
कशामुळे झाला अपघात
चारही विद्यार्थी एकाच दुचाकी शाळेत चालले होते. दुचाकी चालवणारा मुलगा एका हाताने गाडी चालवीत होता, तर त्याच्या दुसऱ्या हातात मोबाईल होता. सोशल मीडियावर टाकण्यासाटी तो रिल बनवत होता, अशी माहिती पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत समोर आली आहे. रिल बनवत असताना त्यांना समोरुन येणाऱ्या वाहणाचा अंदाज आला नाही आणि त्यांची दुचाकी समोरच्या वाहनाला जोरदार धडकली. हा अपघात इतका भीषण होता की चारही विद्यार्थी दूरवर फेकले गेले.
पालकांनो आपल्या मुलांकडे लक्ष द्या
आजच्या सोशल मीडिया लाईफमध्ये मोबाईल प्रत्येकासाठी खूप महत्वाचा झाला आहे. मुलं सतत मोबाईल गेम खेळण्यात किंवा रिल्स बनवण्यात व्यस्त असतात. पण मुलांसाठी फोनचा अती वापर करणे खूप धोकादायक ठरत आहे. त्यामुळे मोबाईल दिल्यानंतर आपला मुलगा काय बघतो, काय करतो, याकडेही पालकांनी लक्ष देणं गरजेचं आहे.