स्कॉर्पिओची दुचाकीला धडक, भीषण अपघातात दोन्ही वाहनांनी घेतला पेट, पोलीस उपनिरीक्षक जागीच ठार
Parbhani Accident News: परभणीत एक भीषण अपघात घडला आहे. या अपघातात एका पोलीस उपनिरीक्षकाचा जागीच मृत्यू झाला आहे.
Parbhani Accident News: परभणी जिल्ह्यात पोलीस उपनिरीक्षकाच्या दुचाकीचा आणि स्कॉर्पिओचा मोठा अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की यात सोनपेठ येथील पोलीस उपनिरीक्षकाचा अपघातात मृत्यू झाला आहे. या अपघाताचा व्हिडिओदेखील समोर आला आहे. रविवारी रात्री हा अपघात घडला आहे.
परभणी जिल्ह्यात पोलीस उपनिरीक्षकाच्या दुचाकीचा आणि स्कॉर्पिओचा मोठा अपघात झाल्याचे समोर येतेय. हा अपघात इतका भीषण होता की यात स्कॉर्पिओला आणि दुचाकी आगीच्या कचाट्यात सापडली होती. यात सोनपेठे येथील पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर गवारे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. गवारे कर्तव्य बजावून सोनपेठवरुन पाथरीकडे जात असताना भारसावडा गावानजीक समोरुन येणाऱ्या स्कॉर्पिओ गाडीची आणि दुचाकींची जोरदार धडक बसली.
गाडीची धडक इतकी भीषण होती की यात गवारे यांची गुचाकी लांबपर्यंत फरफटत गेली. यातच दोन्ही वाहनांनी पेट घेतल्याचे सांगितले जातेय. या अपघातात दोन्ही वाहने जळून खाक झाली आहेत. तर, पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर गवारे हे जागेवरच ठार झाले. प्रभाकर गवारे हे सोनपेठे येथे कार्यरत होते. अपघाताच्या काही क्षण आधीच ते ड्युटी संपवून घराकडे जात होते. मात्र, त्यापूर्वी रस्त्यातच त्यांना मृत्यूने गाठले. पोलीस निरीक्षक रागसुधा या अपघाताबाबत अधिक चौकशी करत आहेत.
नगरसुलजवळ अपघाताचा थरार
येवला नगरसुल रस्त्यावरील गंडाळ वस्ती वळणावर एका छोट्या हत्तीने दुचाकीस्वारास धडक दिल्याची घटना दिनांक 11 जानेवारी 2024 रोजी घडली होती. हा सर्व अपघाताचा थरार पाठीमागे चाललेल्या ट्रकमध्ये लावलेल्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. तरी या दुचाकीवर एक महिला व पुरुष असून हे दोघे जखमी झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.
नगरसुल गावाजवळील गंडाळ वस्तीजवळ वळण रस्ता असल्याने या ठिकाणी दिशादर्शक फलक व गतिरोधक नसल्याने वारंवार या ठिकाणी अपघात होत असून संबंधित प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप रहिवासी वाहन धारक करीत आहे.