Parbhani News : दोन सख्या चुलत भावांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर परभणी (Parbhani) जिल्हा हादरुन गेला आहे. अपघाताच्या (Accident News) दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन सख्ख्या चुतल भावांना आपला जीव गमवावा लागला आहे. अवघ्या तीन दिवसांच्या फरकाने ही धक्कादायक घडल्याचे समोर आले आहे. दोन्ही भावांच्या मृत्यूनंतर परभणी जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 30 एप्रिलला एका भावाचा पाण्यात बुडून तर दुसऱ्या भावाचा 1 मे रोजी रस्ते अपघातात मृत्यू झालाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परभणीच्या पालम तालुक्यातील आरखेड गावामध्ये हा सर्व प्रकार घडला आहे. दोन सख्ख्या चुलत भावांच्या निधनाने आरखेड गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. राजकुमार दुधाटे (28 वर्षे) आणि नितीन दुधाटे (25 वर्षे) अशी मृत भावांची नाव असल्याचे समोर आले आहे. दोन्ही भावांच्या मृत्यूनंतर दुधाटे कुटुंबिय शोकसागरात बुडाले आहेत. शेतातील काम आटपल्यानंतर 28 एप्रिल रोजी राजकुमार दुधाटे हे पोहण्यासाठी गोदावरी नदीच्या पात्रात अंघोळीसाठी गेले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने राजकुमार दुधाटे नदी पात्रात बुडाले. तब्बल तीन दिवसांनंतर 30 एप्रिल रोजी रविवारी राजकुमार दुधाटे यांचा मृतदेह सापडला. यानंतर त्यांच्यावर सोमवारी दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


राजकुमार यांच्या मृत्यूला काही तास उलटत नाहीत तोच दुधाटे कुटुंबियांवर आणखी एक मोठा आघात झाला. सोमवारीच राजकुमार दुधाटे यांचा छोटा आणि सख्खा चुलत भाऊ नितीन मारोतराव दुधाटे याचा अपघात झाला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. 1 मे रोजी रात्री 10 च्या सुमारास पालम ते लोह या राष्ट्रीय मार्गावर नितीनच्या गाडीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की नितीन यांचा जागीच मृत्यू झाला. नितीनच्या मृत्यूची बातमी कळताच दुधाटे कुटुंबियांच्या पायाखालची जमिनच सरकली.


मंगळवारी दुपारी गोदाकाठावरील स्मशानभूमीत नितीन दुधाटे याच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दोन चुलत भावांच्या मृत्यूनंतर संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. राजकुमार दुधाटे यांच्या पाठीमागे आई - वडील, पत्नी, तीन मुली आणि एक बहीण असा परिवार आहे. दुसरीकडे नितीन दुधाटे यांच्या पश्चात आई, पत्नी आणि एक बहीण असा परिवार आहे. त्यामुळे आता घरातील दोन्ही कर्ते पुरुष गेल्याने दुधाटे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, दोन्ही भावांच्या मृत्यूनंतर आरखेड गावातील घरांमध्ये चुलीदेखील पेटल्या नाहीत.