शाळा शुल्कवाढीवर पुण्यात पालक आक्रमक, गोंधळात पाल्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा?
शाळा शुल्कावरून (school fee) पुण्यात (Pune) पालकांनी शाळेत गोंधळ घालत संताप व्यक्त केला.
किरण ताजणे / पुणे : शाळा शुल्कावरून (school fee) पुण्यात (Pune) पालकांनी शाळेत गोंधळ घालत संताप व्यक्त केला. पुण्यातील औंध येथील स्पायसर शाळेत पालक मोठ्या प्रमाणात संतप्त झाले होते. पन्नास टक्केच फी घेऊन शाळा सुरू करावी, अशी मागणी पालकांनी शाळा प्रशासनाला केली होती. मात्र मागणी मान्य न करता थेट शाळाच सुरू न केल्याने शाळेत 500 हून अधिक पालक एकत्र जमले होते. यावेळी त्यांनी आक्रमकपणा धारण केला.
मुलांचे शिक्षण ऑनलाइन होत असताना पूर्ण फी कशासाठी, असा सवाल पालकांनी शाळेला करत आक्रमक भूमिका घेतली. शाळेच्या विरोधात मोर्चा काढत शाळेतच ठिय्या आंदोलन सुरू केले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू न झाल्याने शाळेने पूर्ण फी भरावी, अशी भूमिका घेतली. ती भूमिका स्पायसर शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना मान्य नसून शाळेवर कारवाई करावी, अशी मागणी होऊ लागली.
कोरोनाच्या काळात अनेक पालकांवर उपासमारीची वेळ आल्याने शाळेची फी कशी भरायची, असा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. त्यातच लहान वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाचा प्रभाव कितपत होतोय, असाही प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. त्यातच शाळा प्रशासन शाळा चालविण्यासाठी आणि शिक्षकांच्या पगारबाबत अडचणी येत असल्याची गाऱ्हाणी सांगत आहेत. त्यामुळे पालकांसह विद्यार्थी अडचणीत सापडले आहे. या गोंधळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा अक्षरशः खेळ खंडोबा झाल्याची भावना आता व्यक्त होऊ लागली आहे.