विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : दोन गोड मुली जन्माला आल्या. जवळपास सातव्या-आठव्या महिन्यातच जन्म झाल्यानं त्या अशक्त होत्या. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि बाळांची काळजी घेण्याऐवजी त्यांच्या पालकांनी मुलींना सोडून रुग्णालयातून पळ काढला. ही दुर्देवी घटना औरंगाबादेत घडली आहे. नुकत्याच जन्मलेल्या मुली पालकांना अशा नकोशा का झाल्यात, काय चुकलं या लहान जिवांचं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 दोन गोंडस मुलींना प्रतीक्षा आहे ती त्यांच्या आईवडीलांची. काही दिवसांपूर्वीच त्यांचा जन्म झाला. 27व्या आठवड्यात त्यांना जन्म झाल्यानं त्या अशक्त होत्या, त्यांना औरंगाबादच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारही सुरु झाले, मात्र या गोंडस बाळांच्या आईवडिलांनी बाळांना रुग्णालयातच सोडून पळ काढला. या मुलींना दूधही पिता येत नाहीये इतक्या या मुली अशक्त आहेत. मुलींच्या पालकांना संपर्कदेखील होत नाही आहे.


ज्या वेळी या मुलींना आईची गरज आहे तीच माता या मुलींना त्यागून निघून गेली. या मुलींना दूधही पिता येत नाहीये इतक्या त्या अशक्त आहेत, या नवजात मुलींवर माणूसकीच्या माध्यमातून रुग्णालय उपचार करतेय मात्र तोही किती दिवस असा प्रश्न त्यांना पडला आहे. मुलीच्या पालकांसोबत संपर्क सुद्धा होत नसल्याचं डॉक्टर सांगत आहेत.


या प्रकऱणाची अखेर डॉक्टरांनी पोलिसांना माहिती दिली, याबाबत अनाथ आश्रमाची संपर्क साधून पोलिसांनी सध्या मुलींची सोय केली आहे, मात्र आई वडिल असतांनाही मुलींच्या नशिबी अनाथाचं आयुष्य आलं आहे. पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल करुन आई वडिलांना शोधण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.


या गोंडस मुलींच्या चेह-यावर दुखं दिसतं. कदाचित ज्यावेळी आई वडिलांनी त्यांना कुशीत घ्याव त्याच वेळी आई वडिलांनी त्यांना सोडलं. कारण काहीही असेल, मात्र या मुलींचा त्यात दोष काय?, बरं झाल्यावर मुलींची रवानगी अनाथआश्रमात होणार आहे, आणि आई वडिलांच्या खांद्यावर खेळायच्या या वयात या मुलींना त्यांच्याशिवाय रहाव लागणार आहे. किमान मुलींची ही अवस्था पाहून पालकांचा पाझऱ फुटावा आणि त्यांनी मुलींसाठी परत यावे हीच अपेक्षा.