Valmik Karad: वाल्मिक कराडवर 14 गुन्हे  असतानाही परळीत लाडकी बहीण योजनेच्या समितीचं अध्यक्षपद त्याला देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अनेक गंभीर गुन्हे नावावर असतानाही तो लाडकी बहीण योजनेच्या परळी समितीच्या अध्यक्षपदी कसा निवडला जातो असा सवाल आता विचारला जातोय. कराडच्या समितीवर झालेल्या नियुक्त्यांबाबत आता चर्चा सुरुय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाल्मिक कराड हा परळीचा सर्वेसर्वा होता की काय असा प्रश्न निर्माण झालाय. वाल्मिक कराडला परळीचे राजकीय सर्वाधिकार दिल्याचा आरोप सुरेश धसांनी केला होता. धसांनी जे आरोप केलेत त्या आरोपांमध्ये आता तथ्य दिसू लागलीयेत. राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेल्या लाडकी बहीण योजनेच्या परळी समितीचा वाल्मिक कराड अध्यक्ष आहे. एवढंच नाही तर जिल्ह्याच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या जिल्हा नियोजन समितीचा वाल्मिक कराड सदस्य होता. ज्या व्यक्तीवर 15 गंभीर गुन्हे असताना तो लाडकी बहीण योजना समितीवर कसा असा सवाल उपस्थित केला जातोय.


ज्या व्यक्तीवर खंडणीसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत अशा व्यक्तींना तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या समितीचा अध्यक्ष कसा बनवता असा सवाल खासदार सुप्रिया सुळेंनी उपस्थित केलाय. वाल्मिक कराड हा राजकीय नेत्याच्या बुरख्याआड वावरणारा गुन्हेगार आहे. अशा व्यक्तीला शासकीय समित्यांवर बसवून त्याला संरक्षणाची कवचकुंडलं दिली जातायेत का असा सवाल या निमित्तानं विचारला जातोय. 


वाल्मिक कराडचा कोट्यवधीचा 'बार'नामा


परळीचा बाहुबली वाल्मिक कराडच्या एकाहून एक सुरस कहाण्या समोर येऊ लागल्यात. वाल्मिक कराडनं खंडणी आणि गुंडगिरीतून गोळा केलेला पैसा दारुच्या धंद्यात गुंतवल्याची माहिती समोर आलीये. वाल्मिक कराडनं केज, वडवनी, बीड आणि परळीत दारुची दुकानं थाटल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी केलाय. एका दुकानाची किंमत 4 ते 5 कोटी रुपये धरली तरी पाच दुकानांची मालकी म्हणजे जवळपास दहा ते बारा कोटी रुपये वाल्मिकनं दारुच्या धंद्यात गुंतवल्याचा आरोप करण्यात आलाय.दारुच्या दुकानांमधली उलाढाल लाखोंच्या घरात असल्याचा दावाही दमानियांनी केलाय. वाल्मिक यांनी गुन्हेगारीतून कमावलेला पैसा पुन्हा दारु धंद्यातून दुप्पट तिप्पट केल्याचंही दमानियांचं म्हणणं आहे. बारसाठी त्यानं पावणे दोन कोटी रुपयांना जमीन खरेदी केली आणि त्या जमिनीवर त्यांना एका रात्रीत बारची परवानगीही मिळवल्याचा दावा त्यांनी केलाय. या संदर्भातली काही कागदपत्रही त्यांनी सादर केलीयेत. वाल्मिक कराडनं दारुच्या धंद्यात दहा ते बारा कोटी रुपये गुंतवले असतील तक त्यानं परळीत इतर कोणकोणत्या धंद्यात खंडणीचे पैसे गुंतवलेत याची चौकशी होणं गरजेचं आहे.