नालासोपारा : आज सकाळी संतप्त प्रवाशांनी रेल्वे रूळावर उतरून रेलरोको आंदोलन केलं. नालासोपारा स्टेशनबाहेरील एसटी आगारात एसटी सेवा बंद होती, यानंतर प्रवाशांनी रेल्वे स्टेशनवर येऊन रेल्वेने प्रवास करू देण्याची मागणी केली. मात्र अत्यावश्यक सेवा देणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे सेवा आहे. पण इतर सेवेतील कर्मचाऱ्यांनीही रेल्वे प्रवासासाठी प्लॅटफॉर्मवर गर्दी केली होती. आता अत्यावश्यक सेवा सुरू झाली आहे, कारण पोलिसांना ही गर्दी पांगवण्यास यश आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यात खासगी कंपन्यांमध्ये १५ टक्के उपस्थितीला परवानगी असल्याने, कंपन्यांमध्ये कामासाठी हजेरी लावण्यासाठी प्रवाशांनी मोठी गर्दी केली. दुसरीकडे एसटी सेवा पूर्ववत कशी करता येईल यासाठी एसटी प्रशासन प्रयत्न करीत असल्याचं सांगण्यात येत आहे.


एकीकडे कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना, लॉकडाऊनला अनेक दिवस उलटल्याने कामावर हजर होऊन, नोकरी टिकवण्याचा प्रयत्न सर्वसामान्यांनी सुरू केला आहे. दरम्यान नालासोपारा आणि वसई परिसरात वीज मंडळाने मोठ्या प्रमाणात वीजबीलही आकारलं आहे. शिवाय तक्रारींचं निरसन केलं जात नसल्याच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत.