दिपाली जगताप पाटील,  मीडिया, मुंबई : महाराष्ट्रात नुकतीच राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. मात्र त्याचा फटका सर्वसामान्यांना बसायला लागल्याचं चित्रं स्पष्टपणे दिसत आहे. मुख्यमंत्र्यांसहीत सर्व मंत्र्यांची दालनं बंद झाल्यामुळे सामान्य माणूस प्रशासकीय चक्रव्युहात अडकला आहे. राज्याला मुख्यमंत्रीच नसल्यामुळे किमान सध्याच्या घडीला राज्यात राष्ट्रपती शासन लागू झालं आहे. परिणामी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षच बंद करण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळे मंत्रालयात तक्रारी घेऊन येणाऱ्या जनतेची घोर निराशा होत आहे. त्यात सर्वाधिक फटका बसतोय तो गोरगरीब जनतेला. विशेषत: रुग्णांना. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालय बंद पडल्याच्या कारणाने गरीब रूग्णांचे हाल होत आहेत. झी २४ तासने अशा काही गरजूंच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी नेमकी परिस्थिती समोर आली.  'चार वर्षांच्या साक्षी शिंदेच्या कानांवर केईएम रूग्णालयात शस्त्रक्रिया करायची आहे. ऑक्टोबर महिन्यात साक्षीच्या वडिलांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीअंतर्गत मदतीसाठी आवाहन केलं होतं. पण आता हे दालनच बंद झालं आहे', ही साक्षीच्या आईवडिलांची व्यथा. 


तिथे दुसरीकडे, मंत्रालयाबाहेर कागद पत्रांचा गठ्ठा घेऊन उभे असलेले प्रकाश बोरजेही यापैकीच एक. त्यांचे काका गंगाधर भगत यांच्या अँजिओप्लास्टीसाठी त्यांना मदत हवी आहे. दोन महिन्यांपासून ते इथे खेटे घालत आहेत. पण आता मुख्यमंत्री सहाय्यता कक्षच बंद पडला, तेव्हा त्यांच्यावरही आता पुढे काय असाच प्रश्न ओढावला आहे. 


 



मंत्रालयाच्या बाहेर काम घेऊन आलेल्यांची भलीमोठी रांग आहे. विविध खात्यांअंतर्गत रखडलेली कामं घेऊन राज्यातून आलेल्यांना इथे मात्र कोणताही प्रतिसाद मिळत नाही आहे. Maharashtra Government Formation महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात आलेल्या आतापर्यंतच्या अनेक नाट्यमय वळणांनंतर इथे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली खरी. पण, त्याचे परिणाम मात्र वेगळ्याच रुपात दिसू लागले आहेत. मुळात या परिस्थितीमुळे आता जनताही त्यांना पडलेल्या प्रश्नांना उत्तरं कधी मिळणार य़ाच्याच प्रतिक्षेत आहे.