मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आणि सत्तापालट  2019 च्या निवडणुकीत सगळ्यांनीच पाहिला आणि त्याचा थरारही अऩुभवला आहे. एका दिवसात कशी सत्ता बदलू शकते हे महाराष्ट्राने अगदी जवळून पाहिले आहे. महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपाने एकत्र निवडणूक लढवली. परंतु अंतर्गत मतभेदानंतर शिवसेनेने राष्ट्रवादीसोबत जाण्याचा विचार केला, त्यावेळी संजय राऊत आणि शरद पवारांमध्ये भेटीगाठी वाढल्या. त्यानंतर एनसीपी आणि काँग्रेसने शिवसेनेसोबत जाण्याची तयारी केली होती. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्रात येणार, हे जवळ जवळ निश्चितच झाले होते. इतक्यात 23 नोव्हेंबरच्या बातमीने सगळ्यांनाच धक्का दिला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

23 नोव्हेंबरच्या पहाटे अजित दादांनी फडणवीसांसोबत शपथविधी पार पाडला आणि महाराष्ट्रात एनसीपी आणि भाजपाची सत्ता स्थापन करण्यात आली. त्यानंतर बहूमत सिद्ध न करु शकल्याने हे सरकार बरखास्त करण्यात आले. त्यानंतर अनेक भेटी गाठींनंतर महाविकास आघाडी सरकारने अखेर महाराष्ट्राचे सूत्र आपल्या हाती घेतले.


आज फडणवीस आणि शरद पवारांची भेटीला झाली असल्याने या भेटीचा नक्की काय अर्थ आहे? असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. आज मुख्यमंत्र्यांसोबत अजित पवार आणि बाळासाहेब थोरात उद्घाटन कार्यक्रमात असताना, नेमकी आजच ही भेटी का घेतली गेली? आजचाच मुहूर्त का निवडण्यात आला? असे अनेक प्रश्न या भेटीनंतर उभे राहिले आहे.


या भेटीमध्ये मराठा आरक्षणावर चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मराठा आरक्षणाचा विषय सध्या काँग्रेसकडे आहे, कारण मराठा समितीचे प्रमुख अशोक चव्हाण आहे. त्यामुळे  मराठा आरक्षणाचे अपयश काँग्रेसवर थोपवण्याच्या रणनीतीवर ही चर्चा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.


ओबीसी आरक्षणावर सर्वात जास्त काँग्रेस आक्रमक आहे. शिवसेनाही सध्या अडचणीत आहेत. त्यामुळे या विषयांवर देखील दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असावी. परंतु जर असे झाले, तर आगामी काळात या विषयावर आपल्याला नवे राजकारण बघायला मिळू शकते.


पवार आणि फडणवीस भेटीचे कारण


पवार आणि फडणवीस भेटीवर वेगवेगळे तर्क लावले जात असले तरी, या भेटी मागचे कारण काही वेगळेच सांगितले जात आहे. शरद पवार हे काही दिवसांपूर्वी रुगणलयात होते आणि त्यांची त्यावेळेला भेट घेता आली नसल्याने, फडणवीसांनी पवारांनाना आज भेट दिली आहे.