रायगड : कोटयवधी रुपयांच्‍या गैरव्‍यवहारातील पेण अर्बन बँकेचे माजी अध्‍यक्ष शिशिर धारकर आणि माजी तज्ज्ञ संचालक प्रेमकुमार शर्मा यांना ईडीनं अटक केली आहे. बँकेच्‍या लाखो ठेवीदारांच्‍या ठेवी कधी परत मिळणार असा प्रश्‍न पुन्‍हा एकदा चर्चेत आलाय. गेली ८ वर्षे पिचलेले ठेवीदार आता जगायचं तरी कसं असा प्रश्‍न विचारताहेत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पेण अर्बन बँकेच्‍या ठेवीदारांच्‍या भावना संतप्त आहेत. इतर ठेवीदारांची अवस्‍था याहून वेगळी नाही. अतिशय सुस्थितीत असलेल्‍या या बँकेत महागैरव्‍यवहार  झाला असल्याची बाब ८ वर्षांपूर्वी समोर आली. बँकेच्‍या संचालकांनी बेनामी कर्ज देवून सर्वसामान्‍य ठेवीदारांना देशोधडीला लावल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.


या ठेवीदारांची संख्‍या थोडी थोडकी नव्‍हती तर ती होती १ लाख ८७ हजार इतकी आणि ठेवी होत्‍या. तब्‍बल साडेसहाशे कोटी आज ना उद्या आपली आयुष्‍यभराची पुंजी परत मिळेल, अशा भाबडया आशेवर लाखो ठेवीदार जीवन जगताहेत. बँकेवर प्रशासक नेमल्‍यानंतर कर्जवसुली आणि एका ठिकाणची जमीन विकून १२१ कोटी जमा झाले परंतु ते आभाळाला ठिगळ लावण्‍यासारखं होतं.


ठेवीदारांच्या म्हणण्यानुसार, बुडालेल्‍या पैशातून पनवेल, पेण, पाली, रोहा, राजस्‍थान इथं ज्‍या जमिनी विकत घेण्‍यात आल्‍या आहेत. त्‍या विकून ठेवीदारांचे पैसे सहज परत करता येवू शकतात परंतु ही प्रक्रिया अतिशय संथ गतीने सुरू आहे.


सीबीआय,  न्‍यायालय, सहकार खातं, पोलीस आणि ईडी यांच्‍यासारख्‍या देशातील दिग्‍गज यंत्रणांनी कारवाई केल्‍यानंतरही बँकेच्‍या लाखो ठेवीदारांच्‍या ठेवी परत मिळालेल्‍या नाहीत. त्‍यामुळे न्‍याय मागायचा तरी कुणाकडे असा प्रश्‍न ठेवीदारांना पडलाय.