पुणे : सातत्यानं वाढणारा Coronavirus कोरोना रुग्णांचा आकडा आरोग्य आणि प्रशासनापुढे अनेक आव्हानं उभा करत आहे. त्यातच नागरिकांचा बेजबाबदारपणा कोरोनाचा संसर्ग झपाट्यानं होण्यास आणखी वाव देत आहे. याच धर्तीवर पुणे आणि पिंपरी- चिंचवड परिसरात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोमवारी मध्यरात्री म्हणजे १४ जुलै २०२० पासून पुढील दहा दिवसांसाठी हे लॉकडाऊनचे नियम अधिक कडक असतील. याच पार्श्वभूमीवर नागरिकांनी येत्या दोन दिवसांमध्ये जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्याचंही सांगण्यात आलं. ज्यानंतर मंडईत गर्दी होणं अपेक्षित असतानाच तिथं थेट दारुच्या दुकानांबाहेरील रांगा वाढताना दिसल्या. 


पुण्यात मद्यविक्री करणाऱ्या काही तळीरामानी दारु खरेदी करण्यासाठी म्हणून तोबा गर्दी केल्याचे फोटो एएनआय या वृत्तसंस्थेनं प्रसिद्ध केले. प्रशासनाकडून लॉकडाऊनची अधिकृत घोषणा केल्यानंतर अवघ्या तासाभरातच ही गर्दी पाहायला मिळाली. 



 


पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी कौन्सिल हॉलमध्ये पार पडलेल्या बैठकीत कोरोनाच्या परिस्थितीची पाहणी केल्यानंतर पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला.  ज्याअंतर्गत पुणे आणि पिंपरी चिंचवडसह काही ग्रामीण भागही लॉकडाऊन करण्यात येणार आहे. कोरोना रुग्णांचा वाढता आकडा पाहता नागरिकांनी स्वयंशिस्तीनं लॉकडाऊनच्या नियमांचं पालन करत या संकटावर मात करण्याचं आवाहन शासनाकडून देण्यात येत आहे.