एनआरसीचा मालेगावातील नागरिकांनी घेतला धसका, महापालिकेत लांबच लांब रांगा
यंदा मालेगावात मतदानाचा टक्काही वाढण्याची शक्यता
मालेगाव : भारतीय नागरिकत्व नोंदणी अर्थात एनआरसीचा मालेगावाच्या मुस्लीम बहुल भागातील नागरिकांनी चांगलाच धसका घेतला आहे. रहिवाशी पुरावे घेण्यासाठी महापालिकेत नागरिकांच्या रांगा लागत आहेत. विशेष म्हणजे मतदानाचा हक्क प्रत्येक नागरिक देशाचा नागरिक असल्याचे राजकीय नेते सांगत असल्याने यंदा मालेगावात मतदानाचा टक्काही वाढण्याची शक्यता वाढली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने काही राजकीय पक्षांनी हा मुद्दा प्रचारात आणला. रहिवाशी पुरावा नसेल तर आपण निर्वासित समजले जाऊ या भीतीपोटी नागरीक महापालिकेत जन्मदाखले आणि मृत्यूचे दाखले व रहिवाशी संबधी पुरावे घेण्यासाठी रांगा लावत आहे.
यंदाच्या निवडणुकीत तीन तालाख, मॉब लिंचिंग, कलम 370 व एनआरसी असे मुस्लिम समाजात भिती पसरविणारे मुद्दे प्रचारात आणून राजकीय भांडवल केले जात आहे. प्रचार सभांमध्ये कानी पडणारी एनआरसीच्या भीती जनतेच्या मनात घर करून बसली आहे. मात्र एनआरसी काय आहे याची साधी माहितीही नसलेले नागरिक ऐन निवडणुकीच्या धामधुमीत आपल्या कुटुंबातील सदस्यांचे रहिवासी पुरावे जमा करत आहे. आता पर्यंत माहापालिकेतून 9 हजार नागरिकांना जन्म आणि मृत्यूचे दाखले वाटप करण्यात आले. तर जन्म नोंदी व जुने दप्तर उपलब्ध नसल्याने 20 हजार नागरिकांना नोंद नसल्याचे उत्तर देण्यात आले.
एनआरसीच्या भीतीपोटी मालेगावात नागरिक रहिवाशी पुरावे जमा जाण्यासाठी गर्दी करू लागले आहे. हे लोन अधिकच वाढत जाणार आहे. एनआरसी वरून भेदरलेल्या मालेगावातील नागरिकांचे राजकीय नेत्यांसह व प्रशासनाने समुदेशन करून दिलासा देण्याची गरज आहे .