भाजपच्या मागे जाणारे मतदार नालायक- प्रकाश आंबेडकर
आंबेडकरांनी भाजप आणि काँग्रेसमध्ये साटेलोटे असल्याचाही आरोप केला.
जयेश जागड, झी मीडिया, अकोला: भाजपच्या मागे जाणाऱ्या मतदारांना नालायक नाही तर काय म्हणायचे, असे खळबळजनक वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले. ते बुधवारी अकोला क्रिकेट मैदानावर भारतीय बौद्ध महासभेने आयोजित केलेल्या सभेत बोलत होते. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी भाजपला मतदान करणाऱ्या नागरिकांविषयी संताप व्यक्त केला. मतदार नालायक वागतो म्हणून शासन बेफाम वागते, असे त्यांनी म्हटले.
विशेष म्हणजे आपल्या भाषणात त्यांनी वंचित बहुजन आघाडीचा उल्लेख टाळत विरोधकांना विजयी करण्याचे आवाहन केले. त्यामुळे पडद्यामागे आंबेडकरांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली का, अशी चर्चा रंगली आहे.
आंध्र प्रदेशातील संघप्रचारकाने देशातील बाँबस्फोटांमध्ये संघाचा सहभाग असल्याचा आरोप केला. मात्र, सरकार गप्प का, असा सवालही आंबेडकर यांनी विचारला. याशिवाय, मुख्यमंत्र्यांनी प्रतिज्ञापत्रात लपवलेल्या गुन्ह्यांविषयी माध्यमांच्या भूमिकेवरही त्यांनी टीका केली. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावरील गुन्ह्यांची माहिती जाहीर करावी, असेही त्यांनी म्हटले.
यावेळी आंबेडकरांनी भाजप आणि काँग्रेसमध्ये साटेलोटे असल्याचाही आरोप केला. काँग्रेस अध्यक्ष आणि काँग्रेस नेत्यांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल असताना त्यांना अटक कशी होत नाही? यामध्ये भाजप-काँग्रेसमध्ये साटलोटे आहे का?, असा सवाल आंबेडकरांनी उपस्थित केला.
लोकसभा निवडणुकीच्यावेळी वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांच्या युतीमुळे काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांना पराभवाचा धक्का बसला होता. यानंतर विरोधकांनी वंचित बहुजन आघाडी भाजपची बी टीम असल्याचा आरोपही केला होता. विधानसभा निवडणुकीच्यावेळी काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीशी युती करण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र, प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला अवघ्या ४० जागा देऊ, अशी भूमिका घेतल्यामुळे ही युती प्रत्यक्षात येऊ शकली नव्हती. तर दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांच्या आग्रही भूमिकेमुळे एमआयएमनेही वंचितची साथ सोडली होती.