चेतन कोळस, झी मीडिया,


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिकः निफाड तालुक्यातील सायखेडा ग्रामपंचायतीने एक अनोख ठराव केला आहे. या ठरावाची सध्या नाशिक जिल्ह्यात सर्वत्र चर्चा आहे. गावात यापुढे कोणालाही प्रेमविवाह करायचा असेल तर त्यासाठी आई-वडिलांचे परवानगी पत्र घ्यावे लागेल, असा ठराव ग्रामपंचायतीने मंजूर केला आहे. या अनोख्या ठरावामुळं परिसरात एकच खळबळ माजली आहे. (Nashik Love Marriage)


प्रेमविवाहातून घडलेल्या दुदैवी घटनांमुळे त्याचा सर्वाधिक मनस्ताप संबंधितांच्या कुटुंबीयांना होत असतो. प्रेमविवाहातून घडत असलेल्या चुकीच्या घटनांना आळा बसावा म्हणून ग्रामपंचायतीने हा ठराव संमत केला आहे. गावात यापुढे कुणाला प्रेमविवाह करायचा असेल तर नियोजित वधू-वराच्या आईवडिलांचे परवानगी पत्र अनिवार्य केले आहे. माजी सरपंच भाऊसाहेब काकडे यांनी याबाबतचे पंचायतीला पत्र दिले होते. त्यावर ग्रामसभा घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. 


सायखेडा हद्दीत येणाऱ्या प्रत्येक युवक-युवतींना यापुढे प्रेमविवाह करायचा असल्यास आई- वडिलांची परवानगी घ्यावी लागेल. त्यानंतरच त्यांना विवाह करता येईल, असं ग्रामपंचायतीने म्हटलं आहे. 


दरम्यान, प्रेमविवाह केल्यानंतर आई-वडिलांच्या परवानगीचे पत्र असेल तरच ग्रामपंचायती दप्तरी विवाहाची नोंद करण्यात येणार आहे. त्यानंतर विवाह केल्याचा दाखला मिळणार आहे. ग्रामपचांयतीने अलीकडेच ठरावाची प्रत तहसीलदार, जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार आहे. या निर्णायाची अंमलबजावणी व्हावी यासाठी कायदा करावा अशी मागणीही ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी केली आहे. 


प्रेमविवाह करण्यासाठी आई-वडिलांचे परवानगी पत्र आवश्यक असेल असा ठराव करणारी सायखेडा ही महाराष्ट्रातील पहिलीज ग्रामपंचायत ठरली आहे. या ठरावाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.  


जे मुलं-मुली 18-19 वर्षांचे  झाल्यावर कोर्ट मॅरेज करतात. त्याला आई-वडिलांची संमती नसते. आई-वडिलांच्या संमतीशिवाय व सहीशिवाय हे कोर्ट मॅरेज करता येऊ नये, असा ठराव आमच्या ग्रामपंचायतीने केला आहे,अशी प्रतिक्रिया माजी सरपंच भाऊसाहेब काकडे यांनी दिली आहे.