पुणे : राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार यांनी काल मराठा आरक्षणासंदर्भात व्यक्त केलेली भूमिका पक्षाची नसल्याचे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. पार्थ पवार यांचे ट्विट वैयक्तिक असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. या संदर्भात पक्षाची भूमिका खासदार सुप्रिया सुळे यांनी मांडली असल्याचे ते म्हणाले. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महात्मा गांधींना अभिवादन केले. त्यावेळी ते बोलत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पार्थ पवार यांनी मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. त्यांच्या या भूमिकेवर अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. बीडमध्ये मराठा आरक्षणासाठी तरुणाने आत्महत्या केल्यानंतर पार्थ पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली. यावर अजित पवार यांनी मीडियाने काही प्रश्न विचारले. यावेळी त्यांनी प्रत्येकाला काय ट्विट करावे याचा अधिकार असतो, असे सांगत ही राष्ट्रवादीची भूमिका नसल्याचे स्पष्ट केले.


पार्थचे मत राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका नाही, अलीकडची मुले काही ट्विट करतात. प्रत्येक वेळेस तुमच्या मुलाने हे ट्विट केले विचारले जाते, मला तेवढाच उद्योग नाही. राज्यातील अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या माझ्याकडे आहेत, असे अजित पवार यांनी म्हटले.