औरंगाबाद : मराठा आरक्षणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका मागे घेण्याचा निर्णय एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी घेतला. पंधरा दिवसापूर्वी आमदार जलील यांनी मराठा आरक्षण तातडीने रद्द करण्याची मागणी केली होती. शिवाय मागासवर्ग आयोगाचा अहवालही रद्द करण्यात यावा, मुस्लीम समाजाला ५ टक्के आरक्षण द्यावे, अशी याचिकेद्वारे मागणी केली होती. उद्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये यावर सुनावणी आहे. मात्र, तत्पूर्वी त्यांनी याचिका मागे घेण्याचा निर्णय घेतला. 
 
केंद्र सरकारने सवर्णाना १० टक्के आरक्षणाचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणीही सुरु केली आहे. मात्र, या दहा टक्के आरक्षणासाठी लोक सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. त्यामुळे आता १० टक्के आरक्षणाचा निर्णय नेमका काय होतो, हे आम्हाला वाट पाहावी लागणार आहे. त्यातच आता मुंबई उच्च न्यायालयात आरक्षणाबाबतच्या विविध याचिकावर उद्या सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सगळ्यामध्ये स्पष्टता येत नाही, तोपर्यंत आम्ही याचिका मागे घेण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आमदार इम्तियाज जलील यानी दिली.