एका हातात मोबाईल, दुसऱ्या हातात एक्सिलेटर, शेवटी नको तेच झालं... अपघाताचा थरारक Video
गाडी चालवताना तुम्ही सुद्धा अशी चूक करत असाल तर हा व्हिडिओ एकदा बघाच, दुचाकी चालवत मोबाईलवर बोलणं बेतलं जिवावर
कैलास पुरी, झी मीडिया, पुणे : पुण्यात कार (Car) आणि दुचाकीचं (Motor Cycle) प्रमाण जसं वाढत आहे, तशा अपघातांच्या घटनांमध्येही वाढ होत चालली आहे. बेदरकार गाडी चालवणं, रहदारीचे नियम न पाळणं किंवा मोबाईलवर (Mobile) बोलत गाडी चालवणं अशी कारणं यामागे आहेत. अशीच एक धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडमधल्या (Pimpri-Chinchwad) पिंपळे गुरव भागात समोर आली आहे. दुचाकी चालवताना फोनवर बोलणं एका तरुणाच्या जीवावर बेतलं. या अपघाताचा (Accident) थरार सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाला आहे.
काय आहे नेमकी घटना?
शैलेश गजानन जगताप असं अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पिंपळे गुरव परिसरातील रामकृष्ण मंगल कार्यालय परिसरातून शैलेश जगताप हे काटे पुरम चौकाकडे जात होते. दुचाकीवरून जात असताना शैलेश हा मोबाईलवर बोलत होता. एका हातात गाडीचा एक्सिलेटर आणि दुसऱ्या हातात मोबाइलवर जोरजोरात गप्पा मारत होता. रस्त्यावर असणाऱ्या स्पीड ब्रेकरच्या पट्ट्याचा त्याला अंदाज त्याला आला नाही. त्याचा तोल गेला आणि दुचाकीसकट तो बाजूने जाणाऱ्या स्कूल बसच्या चाकाखाली आला.
हेल्मेट वापरलं असतं तर?
एका हाताने दुचाकी चालवत असल्याने शैलेशला दुचाकीचा आणि आपला तोल सांभाळायची संधीच मिळाली नाही. दुचाकीसकट तो थेट स्कूलबसच्या मागच्या चाकाखाली आला. स्कूल बसचं चाक त्याच्या डोक्यावरुन गेलं आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. शैलेशने दुचाकी चालवताना हेल्मेट वापरलं असतं तर कदाचित त्याचा जीव वाचला असता, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
हे ही वाचा : Manipur Bus Accident: शाळेच्या बसला भीषण अपघात, 7 विद्यार्थ्यांचा मृत्यू तर 25 जखमी
शैलेशच्या अचानक जाण्याने त्याच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. दुचाकी चालवताना प्रत्येकाने हेल्मेट वापरणे आवश्यक आहे. गाडी चालवत असताना मोबाईलवर बोलणे टाळणे गरजेचे आहे नाहीतर आपल्याला आपला जीव गमवावा लागू शकतो, असं आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे. या भागात होणाऱ्या दररोजच्या अपघातांच्या घटनांमुळे या भागात स्पीड ब्रेकर लावावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.