पिंपरी-चिंचवड :  पिंपरी चिंचवडमध्ये महापालिकेच्यावतीने (Pimpri Chinchwad Municipal Corporation)  करण्यात आलेल्या विविध विकासकामांचं विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. पण पिंपरी शहरात आलेल्या देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) आक्रमक कार्यकर्त्यांचा सामना करावा लागला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देवेंद्र फडणवीस पूर्णा नगर इथं अटल बिहारी वाजपेयी उद्यानाच्या उद्घाटनाला आले असता गर्दीतून एका अज्ञाताने देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर चप्पर भिरकावल्याची घटना समोर आली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी या व्यक्तीचा शोध सुरु केला आहे. 


देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
या घटनेवर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस यांनी अशी कृती करणारे चिल्लर असतात असं म्हटलं आहे. भारतीय जनता पार्टीच्या (BJP) सत्तेत कशा प्रकारे चांगल्या पद्धतीची कामं होतात, हे इथे आल्यावर पाहिला मिळतं, पिंपरी-चिंचवड महापालिकेचं, महापौरांचं आणि सर्व पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो असं यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. 


त्यांच्या कार्यकाळात ते काहीच करु शकले नाहीत, आणि आमच्या नगरसेवकांनी, महापौरांनी, पदाधिकाऱ्यांनी चांगलं काम करुन दाखवलं,  त्याबद्दल त्यांच्या मनात असुया आहे, अशी टीका फडणवीस यांनी म्हटलं आहे. 


मराठा आरक्षणा करता ज्या अण्णासाहेब पाटील यांनी आपलं सर्वस्व पणाला लावलं, अक्षरश: बलिदान दिलं. त्या अण्णासाहेब पाटील यांच्या पुतळ्याच्या उद्घाटनाला किंवा अटलजींच्या कामाला विरोध होत असेल तर यांची बुद्धी तपासून पाहयची आवश्यकता आहे, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला आहे. 



उद्घाटनापूर्वी भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने
दरम्यान, या कार्यक्रमापूर्वी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजप कार्यकर्त्यांनीही मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. घोषणाबाजी करत दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने सामने आले होते. 


दोन्ही पक्षांच्या महिला कार्यकर्त्याही मोठ्या प्रमाणात यात सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती आटोक्यात आणली.