IVF technique: IVF तंत्राच्या माध्यमातून स्त्रीला गर्भधारणा होते. हे तर माहिती आहेच. मात्र आधुनिक विज्ञानाची कमाल ही की प्राण्यांवरती सुद्धा हा प्रयोग केला जाऊ शकतो आणि त्यातून योग्य तो जीव जन्माला घातला जाऊ शकतो. हे जर तुम्हाला सांगितलं.तर तुमचा विश्वास बसेल का? मात्र हे खरं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दृष्यात दिसणारी जर्शी आणि होस्टन गाईची ही 2 वासरं तुम्हाला इतर गाईं सारखीच वाटत असतील. मात्र ही वासरं खूप खास आहेत. कारण त्यांचा जन्म आयटी IVF या आधुनिक तंत्रज्ञानाने झालाय.ही किमया साधली आहे पिंपरी चिंचवडच्या ताथवडेमधल्या महाराष्ट्र पशुधन विकास महामंडळानं.या महामंडळात गाईंची दूध देण्याची क्षमता त्याचबरोबर त्यांचं आरोग्य व्यवस्थित राहणारी नवीन जात निर्माण करण्यासंबंधी संशोधन केलं जातं.


त्याचाच भाग म्हणून ब्राझील मधल्या उच्च जातीच्या बैलाचे शुक्राणू आणि भारतातील जास्त दूध देणा-या आणि निरोगी गाईच्या बीजापासून गर्भ तयार केला जातो. आणि तो गर्भ इतर गाईंच्या गर्भाशयात सोडला जातो. त्यामुळे एखाद्या साध्या आणि कमी दूध देणा-या गाईकडूनही जास्त दूध देणा-या निरोगी वासराचा जन्म होतो. यासाठी उच्च दर्जाचं शुक्राणू आणि बीज निवडलं जातं. याचा प्रयोग विविध जातींच्या गाईवर केला जातो.


या प्रयोगशाळेतून आतापर्यंत जवळपास 60 गर्भ तयार करण्यात आलेत. अनेक शेतक-यांनी या सुविधेचा लाभही घेतलाय. तुम्हालाही तुमच्या गाईच्या गर्भात जास्त दूध देणा-या नवीन जातीचं वासरू हवं असेल, तर 24 हजार रुपयांत तुम्ही हा गर्भ तुमच्या गाईच्या गर्भाशयात वाढवू शकता..!
 
पुण्यातल्या या यशस्वी प्रयोगानंतर राज्य सरकारने 8 विभागांत अशा प्रयोगशाळा तयार करण्याचा निर्णय घेतलाय. तसंच लवकरच शेतक-याच्या दारापर्यंत ही सुविधा पोहचवण्याचा प्रयत्न सुरु आहे. 


शेतकऱ्याला शेती बरोबरच आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी चांगले पशूधन आवश्यक असतं. आधुनिक पद्धतीनं दूध उत्पन्न वाढीसाठी आणि निरोगी गाईकरता सुरू असलेलं हे संशोधन नक्कीच फायद्याचं ठरणार आहे.