पिंपरी-चिंचवड : धकादायक आणि तितकीच संतापजनक घटना. एका मुलीवर झालेल्या अत्याचाराची. अवघे १४ वर्ष असताना तिच्या कुटुंबियाना फसवून ४० वर्षीय पुरुषाने तिच्याशी विवाह थाटला. त्यानंतर तब्बल पाच वर्ष तिला नरक यातनांचा सामना करावा लागला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्न झाले तेव्हा ही मुलगी इयत्ता सातवीमध्ये शिकत होती. लातूरला आजीबरोबर राहत होती.  बालाजी तळपते या ४० वर्षीय व्यक्तीने तिला घरासमोर खेळताना पाहिले. तिच्या घरच्यांची माहिती काढली आणि तिच्या आजी-आजोबांना त्याने बोलून विश्वासात घेतले. मुलीला पुढे शिकवतो असे सांगितले. त्यांचा त्यावर विश्वास बसला. त्यांनी लग्नाला संमती दिली. मात्र, लग्न केले तरी ती सज्ञान झाल्यानंतर तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्याचे कबुलही केले. तसेच तिचे आई-वडील थोडेसे गतिमंद होते. तसेच आर्थिक परिस्थिती बेताची. तिच्या आजोबांची आर्थिक परिस्तिथी बेताची असल्याने त्यांनी तिचे लग्न लावून दिले. याचा फायदा त्याने घेतल्याचे दिसून येत आहे.


लग्न झाले आणि तिच्या नरक यातना सुरू झाल्या. लग्न झाल्यानंतर ४० वर्षीय नवऱ्याकडून अल्पवयीन पत्नीवर वारंवार अत्याचार केला गेला. तिचे कुटुंबियांशी संबंध तोडले. प्रचंड शारीरिक त्रास तिला सहन करावा लागला, अशी पीडित मुलीने आपली दर्दनाक कहानी कथन केली. या यातना सहन करत असताना तिला कोणाचाही आधार नव्हता, अखेर तिने एके दिवशी धाडस करून मावशीच्या घरी फोन केला आणि तिची सुटका झाली.


घरी आल्यानंतर मुलीने मावशी आणि काकांना सर्व घटना सांगितल्या आणि अखेर त्यांनी पिंपरी पोलिस स्थानकात पती विरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास सुरू आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी दिली.


दरम्यान, बालाजी तळपते याने आधीही दोन अल्पवयीन मुलींशी लग्न केल्याचे बोलले जात आहे. तसा त्याच्यावर आरोप करण्यात आला आहे. त्यादृष्टीने पोलीस तपास करत आहेत.  आजही अल्पवयीन मुलीचे लग्न लावण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार यानिमित्ताने पुढे आलाय.