पिंपरी-चिंचवड महापालिका घरकुल प्रकल्पाची चौकशी होणार
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या घरकुल प्रकल्पाची चौकशी होणार आहे.
कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या घरकुल प्रकल्पाची चौकशी होणार आहे. या प्रकल्पातल्या बोगस लाभार्थ्यांमुळे आता प्रतीक्षा यादीतील लाभार्थी घरापासून वंचित आहेत असा आरोप होत आहे. बोगस लाभार्थ्यांबाबत महापालिकेच्या विरोधात कष्टकरी कामगार पंचायतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
या याचिकेवर कष्टकरी कामगार पंचायतीचं म्हणणं समजून घेत, उच्च न्यायालयाने पिंपरी-चिंचवड महापालिकेला पुराव्यांची तपासणी करून ४ महिन्यात घरकूल प्रकल्पातील लाभार्थ्यांची माहिती देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे घरकुल प्रकल्पाची आणि तिथल्या बोगस लाभार्थ्यांची चौकशी होणार आहे. त्यामुळे प्रतीक्षा यादीतील ख-या लाभार्थ्यांना न्याय मिळणार आहे असा दावा कष्टकरी कामगार पंचायतीने केला आहे. महापालिकेने याबाबतीत अजून ही भूमिका स्पष्ट केलेली नाही.