वाऱ्याने उडून खड्ड्यात पडलेल्या तरूणाचा मृत्यू
काहीशा विचित्र अशा या घटनेमुळे परिसरात चर्चेला उधान आले आहे.
पुणे: ऐकताक्षणी आश्चर्य वाटावी अशी विचित्र घटना पिंपरी-चिंचवड येथील आकुर्डी येथे घडली आहे. येथे वाऱ्याच्या झोताने एका तरूणाचा बळी घेतला. प्रशांत नरवडे (वय ३० वर्षे) असे मृत तरूणाचे नाव आहे. या विचित्र घटनेची आकुर्डी परीसरात चर्चा सुरू आहे.
हवेत उडाले अन....
प्राप्त माहितीनुसार, प्रशांत नरवडे हा अभियांत्रिकी शाखेत शिकतो. तो व त्याचा मित्र रोहितकुमार विणपत सिंह हे दोघे आकुर्डीजवळील रेल्वे ट्रॅकवर फिरायला गेले होते. दरम्यान, ट्रॅकवरून एक एक्सप्रेस लोणावळ्यावरून पुण्याच्या दिशेने निघाली होती. गाडी येत असलेली पाहून प्रशांत आणि रोहितकुमार असे दोघेही ट्रॅकबाहेर आले आणि ट्रॅकपासून काही अंतरावर जाऊन थांबले. दरम्यान, भरधाव वेगाने आलेली एक्सप्रेस ट्रॅकवरून पुढे निघाली. मात्र, त्यादरम्यान एक्सप्रेसच्या वेगामुळे हवेचा झोत तयार झाला. हा झोत इतका प्रचंड होता की त्यामुळे ट्रॅकपासून काहीच अंतरावर असलेले प्रशांत आणि रोहीत काहीसे उडाले आणि तोल जाऊन जवळच असलेल्या खड्ड्यात पडले. दुर्दैवाने हा खड्डाही तब्बल २० फूट खोल होता.
खड्ड्यात पडले बेशुद्धावस्थेत...
दरम्यान, बेसाध क्षणी उंचावरून पडल्याने दोन्ही तरूणांना जबर मार लागला. त्यामुळे दोघेही बेशुद्ध होते. काही काळाने रोहित शुद्धीवर आला पण, प्रशांतची कोणतीही हालचाल दिसत नव्हती. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार खड्ड्यामधल्या दगडावर डोकं आपटल्याने प्रशांतचा मृत्यू झाला असवा, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, रोहित याची प्रकृतीही गंभीर असून त्याच्यावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काहीशा विचित्र अशा या घटनेमुळे परिसरात चर्चेला उधान आले आहे.